ठाणे : जादा परतावा आणि गुंतवणूकीच्या मोबदल्यात जमीनी मिळवून देतो असे सांगून काही भामट्यांनी सुमारे १०० जणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.
फसवणूक झालेले गुंतवणूवणूकदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ठाणे शहरातील बाजारपेठ परिसरात दोन कंपन्या थाटण्यात आल्या होत्या. २०१५ ते २०१९ या कालावधीत या कंपन्यांमध्ये ठेवींच्या बदल्यात चांगला परतावा मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.
पाच वर्षामध्ये ६९ हजार रुपये भरल्यास एक लाख रुपयांचा मोबदला, तीन वर्षांमध्ये एकूण ३९ हजार ६०० रुपये भरल्यास ५० हजार रुपयांचा मोबदला अशा वेगवेगळ्या योजना यामध्ये होत्या. तर दुसऱ्या कंपनीच्या योजनेत एक लाख रुपये भरल्यास दरमहा दीड हजार रुपये आणि तीन वर्षानंतर मुद्दल पुन्हा मिळणार तसेच गुंतवणूकीच्या मोबदल्यात ६६६ चौ. फूट जागा, एकदाच पाच हजार रुपये भरल्यास सात वर्षांनी पाचपट म्हणजेच, २५ हजार रुपये आणि गुंतवणूकीच्या मोबदल्यास ३३ चौ. फूट जागा अशा विविध योजना गुंतवणूकदारांना देण्यात येत होत्या. त्यामुळे ९६ गुतंवकणूकदारांनी या कंपन्यांत दीड कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांनाच एजंट केले होते. त्यामुळे अनेकांनी यात गुंतवणूक केली होती.
परंतु काही गुतंवणूकदारांना त्यांच्या रकमेचा परतावा मिळत नव्हता. काही गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. परंतु त्यांना आश्वासने दिली जात होती. काही दिवसांनी कंपन्यांचे अधिकारी कंपनीला टाळे ठोकून निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी गुंतवणूकदारांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हे प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.