ठाणे : कळव्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना ४५ दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भाचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी काढले आहेत. कळवा प्रभाग समितीचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक सोपान भाईक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्यासोबतच अनधिकृत बांधकामाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याच प्रश्नावरून काही महिन्यापूर्वी कळवा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता.
तसेच ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही शहरातील अनधिकृत बांधकांबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. महापालिका आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात. परंतु निर्ढावलेले अधिकारी फक्त नोटिसांचा खेळ खेळतात असा आरोप केळकर यांनी केला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे सभागृहात सांगितले होते.
हेही वाचा : ठाण्यातही विशेष मुलांसाठी उपचार केंद्र सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
अनधिकृत बांधकाम प्रकरणात ठाणे महापालिकेचे कळवा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याविरोधात नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भाचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आदेश काढले आहेत. सुबोध ठाणेकर यांना ४५ दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे निदर्शनास आणून देखील सुबोध ठाणेकर यांनी कारवाईची मानसिकता दाखविली नाही. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणात सुरू आहेत अशा बांधकामांना रोखण्यात आले नाही. ही बाब नागरिकांच्या जीवाशी खेळणारी आहे.
हेही वाचा : ठाण्यातील उच्चभ्रू वस्तीत ‘फॅमेली सलोन आणि स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय; एका दलाल महिलेला अटक
सुबोध ठाणेकर यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी याबाबत कोणताही समर्पक खुलासा केला नाही तसेच कामकाजामध्येही सुधारणा करण्याची मानसिकता दाखवली नसल्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामांची वैयक्तीक जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सक्तीच्या रजेच्या कालावधीनंतर त्यांची नियुक्ती अकार्यकारी पदावर करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच कळवा प्रभाग समितीचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक सोपान भाईक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.