अंबरनाथ: अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याच्या टाक्यांमध्ये सुरू असलेल्या कामावेळी विजेचा धक्का लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक कामगार जखमी झाला आहे. गुरूवारी ही घटना झाली. याच केंद्रातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना आणि सर्वच औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. हे करत असताना पाण्याची टाकी पंप लावून रिकामी केली जात होती. त्याचवेळी हा पंप बंद पडल्याने कामगार तो पंप पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. पंप बंद असला तरी विजेचा प्रवाह सुरूच असल्याने चार कामगारांना विजेचा धक्का बसला. त्यात तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला, अशी माहिती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांनी दिली आहे. तर एक कामगार गंभीर जखमी झाला.

हेही वाचा : डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली

शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८) आणि राजन मंडल(१९) अशी मृत कामगारांची नावे आहेत. एमआयडीसी प्रशासनाकडून हे काम एसएमसी मदानी जेव्ही यांना देण्यात आले होते. या घटनेत नक्की चूक कुणाची हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारीही कंत्राटदार कंपनीचीच असल्याचे मत एमआयडीसी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. कामगार कायद्यानुसार मृत कामगारांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane at ambarnath three workers died due to electric shock at midc jambhul water purification plant css