Lok Sabha Election 2024 Result Updates कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा एकतर्फी विजय झाला असला तरी याच मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर राणे यांना मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या वेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबाजी पाटील यांना अंबरनाथमधून ३१ हजार मते होती. या मतांमुळे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किणीकर ६० हजार मते मिळवून विजयी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अंबरनाथ शहरात सर्वाधिक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे त्यांच्यासाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील लढाई तशी सोपी समजली जात होती. त्यात अंबरनाथ शहरात विरोधी पक्ष नावापुरता राहिला होता. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पडलेले खिंडार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची निष्प्रभता आणि ठाकरे गटाला नसलेले सक्षम नेतृत्व यामुळे अंबरनाथमधून विजयी आघाडी मिळण्याची आशा शिवसेनेला होता. तशी ती आघाडी मिळालीही. डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून ९३ हजार ६७० मते मिळाली. गेल्या निवडणुकीत ८८ हजार ८१० मते डॉ. शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे यंदा मतांची संख्या वाढली. मात्र त्याचवेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांनी तब्बल ५८ हजार २८ इतकी मते मिळवली. त्यामुळे शिवसेना – भाजप महायुतीसह अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाबाजी पाटील यांना ३१ हजार १४३ मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा दरेकर यांना २६ हजार अधिक मते मिळाली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोच्या रात्रभराच्या खोदाईने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त

लोकसभा निवडणुकीतील मतांवर विधानसभा मतांचे आकडे अवलंबून असतात. गेल्या लोकसभेत डॉ. शिंदे यांना ८८ हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांना विधानसभेत ६० हजार ०८३ मते मिळाली होती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेस उमेदवार रोहित साळवे यांना ३० हजार ७८९ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे विधानसभेतील विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लढाई आणखी कठीण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. प्रभावी प्रचाराचा अभाव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कमतरता आणि सहकारी पक्षांची ताकद नसतानाही ठाकरे गटाने मिळवलेल्या या मतांमुळे विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane at ambarnath uddhav thackeray ss candidate vaishali darekar rane gets 58 thousand votes css