बदलापूरः बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे खड्डे बुजवण्यात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शहरातील पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी ऐन दुपारी पाऊण ते एक तासांचा वेळ लागतो आहे. त्यामुळे प्रवासी हैराण होत असून त्याचा सर्वाधिक फटका शाळेच्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. ही वाहतूक कोंडी सायंकाळी बदलापूर शहराच्या पश्चिमेतील प्रवेशद्वारापासून ते थेट उड्डाणपूल आणि दुसरीकडे कर्जत राज्यमार्गापर्यंत पोहोचते आहे. यात बेलवलीतील भुयारी मार्गही सुटलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूल गेल्या महिन्याभरापासून खड्ड्यात अडकला आहे. सुरूवातीला पुलाच्या मधोमध खड्डे पडले होते. मात्र गेल्या काही दिवसात पूर्वेतील पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट पश्चिमेतील उड्डाणपूल संपतो तीथपर्यंत खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे या मार्गातून जाण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना दुकाची, चारचाकी वाहने वळण घेत असल्याने येथे वाहनांचा वेग पूर्ण मंदावतो. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यात शहरातल्या पूर्व पश्चिम भागात उड्डाणपुलाशिवाय दुसरा जवळचा मार्ग नसल्याने सर्वच वाहने याच मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सकाळी अकरा ते एक आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत मोठ्या प्रमाणावर शहरात कोंडी वाढते आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर पश्चिमेतील प्रवेशद्वारापासून ही कोंडी सुरू होते. बेलवली भागातील भुयारी मार्गात जाण्यासाठी वाहने वळण घेत असल्याने त्या चौकात मोठी कोंडी होती. त्याचा परिणाम थेट मांजर्ली, दत्तचौक परिसरापर्यंत होतो. त्यात पुढे उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे दत्त चौक परिसरातून कोंडी सुरू होते. तेथून पूर्वेत जाईपर्यंत वाहनांना अर्धा ते एक तास लागतो आहे. याचा शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो आहे. या कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरचे पाच ते सात मिनिटींचे अंतर गाठण्यासाठी अर्धा ते एक तास खर्ची घालावा लागतो आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत संतापाचे वातावरण आहे.

हेही वाचा : कडोंमपातील खंडणीखोर कामगार विनोद लकेश्री निलंबित, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कठोर कारवाई

खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष

कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो आहे. सध्या दररोज सुर्यदर्शन होत असून पावसाची उघडीपही मिळते आहे. त्यानंतरही खड्डे बुजत नसल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. एकीकडे शहरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासह शहरातील दिग्गज नेत्यांच्या वाढदिवसाचे शहरभर बॅनर लागले आहेत. मात्र एकाही लोकप्रतिनिधीकडून खड्ड्यांवर प्रश्न उपस्थित केला जात नसल्याने नागरिकांत नाराजी वाढली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane at badlapur passengers suffers due to potholes on bridge css