ठाणे : केळी विक्रेत्याकडून केळी खरेदी करताना एक केळ अधिकचे घेतल्याने विक्रेता आणि त्याच्या मुलाने ग्राहकांवर राॅडने हल्ला करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी केळी विक्रेता राम गुप्ता (४४) आणि त्याचा मुलगा संजय गुप्ता (१९) यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रविवारी त्यांना अटक केली आहे.
भिवंडी येथील कामतघर भागात राहणारा तरूण त्याच्या मित्रासह शनिवारी सायंकाळी नारपोली येथील हनुमान मंदिर परिसरातून पायी जात होते. त्यावेळी केळी विक्रेता राम हा त्याच्या हातगाडीवर तेथे केळी विक्री करत होता. तरूणाने त्याच्याकडून अर्धा डजन केळी विकत घेतली. त्यावेळी तरूणाच्या मित्राने एक केळ जास्त घेतले. त्याचा राग आल्याने राम याने त्याला धक्का दिला. एका केळ्याचे पैसे अधिक घे परंतु धक्काबुक्की करू नको असे त्याने रामला खडसावले. त्यानंतर राम याने मोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
हेही वाचा : मुंबईकरांनो, प्रवासात सोबत लॅपटॉप बाळगताय? मग कल्याण रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणीसोबत घडलेली ही घटना वाचा!
दरम्यान, राम याचा मुलगा संजय हा त्याठिकाणी आला. त्याने घडलेला प्रकार राम याला विचारला. त्यानंतर संजय याने हातगाडीखाली ठेवलेला लोखंडी राॅड बाहेर काढला. त्यानंतर त्याने दोघांनाही जीवंत सोडणार नाही असे धमकावत तरूणाच्या मित्राच्या डोक्यात राॅड मारला. त्यावेळी तरूण मित्राच्या बचावासाठी गेला असता, त्याच्याही डोक्यात राॅड मारण्यात आला. पुन्हा संजय हा त्या तरूणांना राॅड मारत असताना त्याचा राॅड त्यांनी पकडला. त्यावेळी संजय याने तरूणाच्या हाताला चावा घेतला. या घटनेनंतर तरूणाने राम आणि संजय यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संजय आणि राम या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.