कल्याण : भिवंडी येथील एक खासगी रूग्णालय टिटवाळा येथील दोन डाॅक्टर आणि त्यांच्या पत्नीने चालविण्यास घेतले. या उपक्रमात ठाण्यातील एका डाॅक्टर दाम्पत्याला सहभागी करून घेतले. रूग्णालय चालविण्यासाठी लागणारा खर्च, वैद्यकीय साधनांसाठी टिटवाळ्यातील डाॅक्टरांच्या गटाने ठाण्यातील डाॅक्टर दाम्पत्याकडून कर्ज घेऊन, अन्य मार्गाने पैसे उकळले. त्यानंतर ते पैसे स्वताच्या स्वार्थासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
या प्रकरणात फसवणूक झाल्याने ठाण्यातील डाॅक्टर दाम्पत्याने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ठाण्यातील डाॅक्टर रूपा संदीप राव (फिजिओथेरेपिस्ट) यांनी या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. डाॅ. राव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डाॅ. दिनेश सुखदेव डोळे, डाॅ. नवलकिशोर अण्णासाहेब शिंदे, शितल नवलकिशोर शिंदे, वैशाली दिनेश डोळे यांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा : ठाण्यात ज्यू धर्मस्थळाला बाॅम्बने उडविण्याची धमकी
पोलिसांनी सांगितले, आरोपी डाॅक्टरांनी ठाण्यातील डाॅक्टर रूपा राव आणि डाॅक्टर संदीप राव (भूलतज्ज्ञ) या पती-पत्नीचा विश्वास संपादन केला. आरोपी आणि तक्रारदार हे व्यवसायाने डाॅक्टर आणि एकमेकांना परिचित आहेत. एकमेकांच्या सहकार्याने त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला आहे. आरोपींनी भिवंडीतील डाॅ. राजू मुरूडकर यांचे ऑरेंज रूग्णालय मालविका हाॅस्पिकेअर एलएलपीच्या माध्यमातून आपण चालविण्यास घेत आहोत. यामध्ये आपलाही सहभाग महत्वाचा आहे असे सांगून राव दाम्पत्याला या भागीदारीत सहभागी करून घेतले.
हेही वाचा : ठाणे : मद्यपींना घरी पोहचविण्याची जबाबदारी बार मालकांची
जुलै २०२१ मध्ये ऑरेंज रूग्णालय भाडे तत्वावर चालविण्यास सुरूवात झाली. डाॅ. नवलकिशोऱ् शिंदे रूग्णालयाचे दैनंदिन व्यवस्थापन बघत होते. डाॅ. मुरूडकर यांना पहिल्या टप्प्यात २० लाख रूपये भाडे देण्यात आले. आरोपींनी राव दाम्पत्याला रुग्णालयातील वैद्यकीय साधने, औषध दुकान, रूग्णालय तोट्यात अशी विविध कारणे सांगून पैसे उकळण्यास आणि कर्ज घेण्यास भाग पाडले. डाॅ. संदीप राव यांच्या नावाने दोन कोटी पाच लाख ५० हजार रूपयांचे कर्ज बँकेतून मंजूर करून घेण्यात आले. राव यांनी यामधील एक कोटी ९४ लाख २३ हजार रूपये मालविका हाॅस्पिकेअर कंपनीच्या नावे वर्ग केले.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात वेठबिगारी सुरूच; अवघ्या पाच हजार रुपयांसाठी वीटभट्टीवर कातकरी दाम्पत्याला आठ वर्ष राबविले
बँक व्यवहारात राव दाम्पत्याला अंधारात ठेऊन काही गोष्टी आरोपींकडून केल्या जात होत्या. जीसएटी क्रमांक काढणे, रुग्णालयात जमा होणारी दैनंदिन रुग्ण सेवेतील रक्कम खर्चासाठी वापरली जात असल्याचे राव यांच्या निदर्शनास आले. एक कोटी ९४ लाखातील रक्कम आरोपींनी रुग्णालयासाठी न वापरता स्वताच्या फायद्याकरता वापरली. दरम्यान कर्जाचे हप्ते थकू लागले. राव दाम्पत्याला बँकेकडून विचारणा होऊ लागली. हप्ते भरण्यासाठी राव दा्म्पत्याला मानसिक त्रास देण्यात येऊ लागला. व्यवसायात अडथळे आणले. चुकीच्या व्यवहारांमुळे डाॅ. राव यांना न्यायालयात जावे लागले. या गैरप्रकारामुळे राव दाम्पत्याने आरोपींच्या मालविका भागीदार कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आरोपींनी बँकेतील कर्जाऊ रक्कम भागीदार रुग्णालय व्यवस्थापनासाठी न वापरता आपली फसवणूक केली म्हणून टिटवाला पोलीस ठाण्यात डाॅ. रूपा राव यांनी तक्रार केली आहे. ऑरेंज रुग्णालयाचे डाॅ. मुरूडकर यांनीही आरोपींना रुग्णालयाचा ताबा सोडण्याची नोटीस दिली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.