ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली आणि ठाणे रेल्वे स्थानका दरम्यान तयार करण्यात आलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानकातून पाच दिवसांत १ लाख ३२ हजार ८७१ प्रवाशांनी प्रवास केला. मंगळवारी प्रवाशांची संख्या ६३ हजाराहून अधिक होती. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर पाच दिवसांत मध्य रेल्वेने या स्थानकातून ६ लाख ३८ हजार ५२० रुपयांचा महसूल मिळाला आहे. दिघा गाव स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार देखील काहीसा हलका झाला आहे.
नवी मुंबई शहरातील दिघा परिसर, ऐरोली, रबाळे आणि घनसोली भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा, मुलुंड, भांडूप भागातून प्रवास करणारे लाखो प्रवासी ठाणे स्थानकातून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईत जात असतात. तसेच नवी मुंबईमधील ऐरोली आणि दिघा या भागातही मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. पूर्वी दिघा गाव स्थानक नसल्याने दिघा, विटावा, कळवा भागातील प्रवाशांना ऐरोली किंवा ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे ठाणे आणि ऐरोली स्थानकात प्रवाशांचा अतिरिक्त भार वाढत होता. या स्थानकातील भार हलका व्हावा तसेच नागरिकांचे हाल टाळता यावे यासाठी २०१६ मध्ये रेल्वे प्रशासनाने ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान दिघा गाव हे स्थानक तयार करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा : कल्याण मधील शेतकऱ्याची वन विभागात नोकरी लावतो सांगून फसवणूक
सुमारे आठ महिन्यांपूर्वी हे स्थानक तयार झाले होते. परंतु स्थानकाचे लोकार्पण लांबणीवर टाकले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीम देखील हाती घेतली होती. त्यामुळे या स्थानकाच्या लोकार्पणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अखेर १२ जानेवारीला सायंकाळी या स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सायंकाळी पहिल्याच दिवशी या स्थानकातून ५८६ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर, शनिवारी आणि रविवारी देखील स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मागील पाच दिवसांत १ लाख ३२ हजार ८७१ प्रवाशांनी प्रवास केला. मंगळवारी प्रवाशांची ६३ हजाराच्या घरात पोहोचली होती. दिवसेंदिवस स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
५ दिवसांतील प्रवासी संख्या व महसूल (रुपये)
तारीख | प्रवासी संख्या | महसूल (रुपये) |
१२ जानेवारी | ५८६ | ४,४९० |
१३ जानेवारी | १७,११२ | ८१,७९५ |
१४ जानेवारी | २१,१४७ | १,१०,०८० |
१५ जानेवारी | ३०,८६८ | १,४४,७१५ |
१६ जानेवारी | ६३,१५८ | २,९७,४४० |
एकूण | १,३२,८७१ | ६,३८,५२० |