ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ भागात शनिवारी पहाटे एका बंगल्याला लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा मृत्यु झाला तर, घरातील तीन जण मात्र वेळीच बाहेर पडल्याने बचावले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घरातील देवघराला आग लागून ती इतरत्र पसरून ही घटना घटना घडली. अभिमन्यू मढवी (६०), रमाबाई मढवी ( ५५ ), असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर, प्रणाली मढवी (३० ), कविश मढवी (१३), पलाश मढवी ( १२) अशी तिघेजण बचावले आहेत. हे सर्वजण घोडबंदर येथील वाघबीळ भागातील हिरानंदानी इस्टेट रोड परिसरातील मढवी निवास या तळ अधिक २ मजली बंगल्यात राहतात.
हेही वाचा : विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनीटात
शनिवारी पहाटे ३.२० वाजता या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी, कासारवडवली पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. आगीमुळे पाचही जण बंगल्यात अडकले होते. त्यातील प्रणाली, कविश मढवी, पलाश हे स्वतःहून वेळीच बाहेर पडले आणि त्यामुळे ते बचावले. तर अभिमन्यू आणि रमाबाई हे दाम्पत्य बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोघे मृत झाल्याचे हिरानंदानी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.