ठाणे : अमदनगर येथील सिन्नर भागातून पेरू विक्रीसाठी आलेल्या मालवाहतुकदार आणि मजूरावर दोघांनी चाकू हल्ला करत त्यांना लुटल्याचा प्रकार मुंबई-नाशिक महामार्गावर उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर येथे मजूर दिपक ननावरे आणि मालवाहतूकदार चेतन डमाळे वास्तव्यास आहेत. मंगळवारी ते सिन्नर येथून पेरूच्या फळांनी भरलेला ट्रक घेऊन मिरारोड येथे गेले होते. या पेरूंचे चेतन यांना १७ हजार रुपये मिळाले. त्यामुळे बुधवारी पहाटे ४ वाजता ते मुंबई नाशिक महामार्गावरून सिन्नरच्या दिशेने निघाले. त्यांचा ट्रक मानकोली भागात आला असता, दुचाकीवरून एक महिला आणि तिचा साथीदार आला. त्यांनी ट्रक अडविला. तसेच ते दोघे ट्रकमध्ये शिरले. त्या दोघांच्या हातामध्ये चाकू होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत बनावट बांधकाम मंजुऱ्यांद्वारे ८७ बेकायदा इमारतींची उभारणी, नगररचना विभागाच्या अभिलेखातून माहिती उघड

चाकूचा धाक दाखवून त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितले असता, महिला आणि तिच्या साथीदाराने दोघांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात दिपक आणि चेतन दोघे गंभीर जखमी झाले. तसेच चेतन यांच्याकडे असलेले १७ हजार रुपये त्यांनी खेचून घेतले. त्यानंतर दोघांचे मोबाईल घेऊन तिथून निघून गेले. दिपक आणि चेतन जखमी अवस्थेत परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. याप्रकरणाची माहिती नारपोली पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane at mumbai nashik highway woman and her partner robbed truck driver for rupees 17000 css