ठाणे : नौपाड्यात एका नवीन बांधकामामुळे गॅस वाहिनी बाधित होत असल्याने ती स्थलांतरित करण्याचे काम महानगर गॅस कंपनीने शनिवारी हाती घेतले होते. या कामासाठी सायंकाळी ६ ते ७ असा एक तासांसाठी परिसराचा गॅस पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्याचा फटका शेकडो ग्राहकांना बसला. महानगर गॅस कंपनीकडून ठाणे आणि मुंबई परिसरात घरगुती गॅसचा वाहिनीद्वारे पुरवठा करण्यात येतो. परंतु या वाहिन्या तुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असून यामुळे घरगुती गॅस पुरवठा काही तासांसाठी ठप्प होत असल्याचे चित्र दिसून येते. तसेच आपत्कालीन कामांकरीता गॅस पुरवठा बंद ठेवण्यात येतो.
अशाचप्रकारे नौपाड्यात एका नवीन बांधकामामुळे गॅस वाहिनी बाधित होत असल्याने ती स्थलांतरित करण्याचे काम महानगर गॅस कंपनीने शनिवारी हाती घेतले होते. बांधकामादरम्यान वाहिनी तुटून परिसराचा गॅस पुरवठा ठप्प होऊ नये आणि कोणताही अपघात घडू नये यासाठी हे काम हाती घेतले होते, अशी माहिती महानगर कंपनीकडून देण्यात आली.
या कामासाठी सायंकाळी ६ ते ७ असा एक तासांसाठी परिसराचा गॅस पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्याचा फटका नौपाडा येथील गोखले रोड, भास्कर कॉलनी, एम जी रोड, सानेगुरुजी रोड, दिनकर गांगल रोड, हितवर्धनी रोड या भागातील ग्राहकांना बसला. वाहिनी स्थलांतरित काम पूर्ण करून रात्री १० वाजता गॅस पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे संदेश कंपनीने ग्राहकांना पाठविले होते. यामुळे ग्राहक हवालदिल झाले होते. परंतु वाहिनी स्थलांतरित काम पूर्ण करून अवघ्या तासाभरात म्हणजेच सायंकाळी ७ वाजता गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.