ठाणे : घोडबंदर येथील आर माॅल जवळील पादचारी पुलावरून रस्ता ओलांडत असताना एका तरूणीचा मोबाईल खेचून तिला धमकाविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्षभरापूर्वी याच पुलावर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी बनविण्यात आलेले पादचारी पुल महिलांसाठी असुरक्षित ठरत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
दिवा येथे राहणारी २६ वर्षीय मुलगी घोडबंदर येथील मानपाडा भागात कामाला आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी तिने २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल खरेदी केला होता. रविवारी तरूणी कामा निमित्ताने मानपाडा येथे आली होती. रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ती रस्ता ओलांडण्यासाठी आर माॅल येथील पादचारी पूलावर आली. त्याचवेळी एक तरूण तिच्या मागून आला. त्याने तरूणीच्या हातातील मोबाईल खेचला. तसेच तरूणीला खाली पाडले. त्यानंतर त्या चोरट्याने तरूणीला पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चोरटा काही अंतरावर गेला असता तरूणीने आरडाओरड केली. त्यावेळी विनायक कुडेकर, राहुल राठोड आणि आनंद गुप्ता या तिघांनी त्या चोरट्याला पकडले.
हेही वाचा : महानगरांच्या कोंडीमुक्तीसाठी सामायिक आराखडा; ठाण्यासह नवी मुंबई, पालघर, मीरा-भाईंदर पोलिसांचे नियोजन
त्याला पोलीस ठाण्यात आणले असता त्याने त्याचे नाव आतिष धीवर असल्याची माहिती दिली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धीवर याला ताब्यात घेतले आहे. या पादचारी पूलावर ऑगस्ट २०२२ मध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली होती.