ठाणे : उल्हासनगर भागात भाजी विक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेच्या पोटातील दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा काढण्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॅाक्टरांना यश आले आहे. या महिलेवर सोमवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा सामान्य रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी देवदूत ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. उल्हासनगर शहरात ही महिला वास्तव्यास असून ती ४८ वर्षाची आहे. शहरातचं ती भाजी विक्रीचा व्यवसाय करते. या महिलेच्या पोटात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दुखत होते.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन पोटाची तपासणी करणे तिला व तिच्या कुटूंबाला शक्य नव्हते. त्यामुळे या दुखण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतू, मागील काही दिवसात हे दुखण आणखी वाढले. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात ही महिला उपचारासाठी दाखल झाली. त्यानंतर, २० जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी या महिलेला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन काढल्या नंतर तिच्या पोटात पाण्याने भरलेला मासाचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. ही शस्त्रक्रिया थोडी अवघड होती.
हेही वाचा : डोंबिवलीत प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची मित्राच्या मदतीने हत्या, आडिवलीतील विहिरीतील मृतदेहाची ओळख पटली
परंतू, रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी या महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील सुमारे दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा बाहेर काढला, असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके यांनी दिली. रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : कल्याण मधील आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प, कर्मचारी मराठा नोंदी सर्वेक्षणाच्या कर्तव्यावर
“महिलांच्या पोटातील मासाचा गोळा शरीरातील काही बदला मुळे होतो. पोटात सारखं दुखणे, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास इत्यादी लक्षणे आढळतात. काहीवेळा हा गोळा कर्करोगाचा ही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवला आहे.” – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.