ठाणे : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात दोन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. परंतु किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो असणाऱ्या भाज्या १०० ते १२० प्रतिकिलो दराने विक्री करून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. दरम्यान, वातावरणातील बदलांमुळे भाजीची आवक कमी झाल्याने भाजी महागल्याचा दावा विक्रेत्यांनी केला.
‘एपीएमसी’त पुणे, नाशिक, कोल्हापूर येथून भाज्यांची आवक होत असते. तसेच गुजरात, कर्नाटकातून पुरेशा प्रमाणात भाज्यांची आवक होते. ‘एपीएमसी’तील भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात दररोज ७०० च्या आसपास गाड्या दाखल होतात. परंतु बुधवारी ५६० गाड्या दाखल झाल्या.
हेही वाचा : कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार
वातावरणातील बदलामुळे भाजीचे उत्पादन कमी प्रमाणात होते. त्यामुळे आवक काही प्रमाणात कमी होत असल्याने भाज्यांचे दर वधारल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात दोन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. परंतु किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो असणाऱ्या भाज्या १०० ते १२० प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. घाऊक बाजारात मटार १९ रुपये प्रति किलो, तर किरकोळीत ३२० रुपये किलो या दराने विकली जात आहे. तसेच ३२ रूपये किलो फ्लॉवरचे दर किरकोळीत १२० रूपये किलो आहेत.
पावसामुळे भाज्यांचे खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव असल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
विजय साहू, किरकोळ भाजी विक्रेते, ठाणे
वातावरण सतत ढगाळ असल्याने भाजीचे उत्पादन कमी येते. त्यामुळे भाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे.
नाना बोरकर, भाजी व्यापारी(अध्यक्ष), वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती
हेही वाचा : Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
घाऊक बाजार दर(प्रतिकिलो)
भेंडी ४० रुपये
फुलकोबी ३२ रुपये
घेवडा ५२ रुपये
कारले ३१ रुपये
ढोबळी मिरची ३३ रुपये
वांगी ३७ रुपये
मेथी १७ रुपये
मटार १८ रुपये
भाजी – आता – पूर्वी (प्रतिकिलो)
मटार ३२० रुपये १६० रुपये
फ्लॉवर १२० रुपये ६० रुपये
कारले १०० रुपयेे ६० रुपये
भेंडी ८० रुपये ६० रुपये
वांगी ८० रुपयेे ६० रुपये
घेवडा १०० रुपये ६० रुपये
ढोबळी मिरची १०० रुपये ६० रुपये
मेथी ५० रुपयेे ३० रुपये
कोथिंबीर १४० रुपयेे ४० ते ५० रुपये