ठाणे : नमाज पठण करुन रमजान महिन्याचा रोजा (उपवास) सोडण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुणावर लोखंडी फावड्याने जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शाहरुख शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक झालेली नाही. पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाजुरी येथील गौतम नगर परिसरात हुसेन रजाक (२७) हा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याच्या कुटुंबाचा फर्निचरचा व्यवसाय असल्याने हुसेन हा त्याच्या वडिलांना मदत करतो. रमजान महिना सुरू असल्याने हुसेनच्या कुटुंबाचा रोजा सुरु आहे. मंगळवारी दुपारी हुसेनचे वडील त्यांच्या दुकानामध्ये असताना शाहरुख शेख हा त्यांच्या दुकानाबाहेर दुचाकीवरून आला. तसेच हुसेनला समजवा अशी धमकी त्याने दिली. हुसेनच्या वडिलांनी प्रकरण विचारले असता, तो तेथून निघून गेला. मंगळवारी रात्री हुसेन हा हाजुरी येथील दर्गामध्ये नमाज पठण करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याचे वडील देखील होते. नमाज पठणकरुन झाल्यानंतर हुसेनचे वडिल त्यांच्या परिचित व्यक्तींसोबत बोलत होते. दरम्यान, रोजा असल्याने हुसेन हा घरी जात असताना शाहरुख त्याच्या मागून आला. त्याने हुसेनच्या डोक्यात लोखंडी फावड्याने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यानंतर शाहरुख तेथून निघून गेला. हल्ल्यात हुसेन याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. हुसेनच्या वडिलांना या बाबत माहिती मिळताच, ते तेथे पोहचले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने हुसेन याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्याने हुसेन बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी शाहरुख विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शाहरुख याला अटक झाली नसल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.