ठाणे : संपूर्ण देशामध्ये चर्चेत ठरलेल्या बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (२४) याचा शेवट नेमका कसा झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आलेला आहे. अक्षय शिंदे याने बंदूक खेचल्यानंतर पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखून ‘आपण आता कोणालाही जीवंत सोडणार नाही, असे म्हणत पोलिसांवर गोळीबार केला होता. तसेच गोळी झाडण्यापूर्वी तो वारंवार पोलिसांना शिवीगाळ करून मला कशासाठी घेऊन जात आहात? मी आता काय केले आहे? असे म्हणत होता. पोलिसांवर त्याने गोळी झाडल्याने त्याला स्वसंरक्षणार्थ ठार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणात पोलिसांनी अक्षय शिंदे विरोधात हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केल्यानंतर त्याच्याविरोधात आता पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तळोजा येथून अक्षय शिंदे याला मध्यवर्ती गुन्हे शोध पथक ठाण्याच्या दिशेने घेऊन येत होते. त्यावेळी पोलीस वाहनामध्ये मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, अमली पदार्थ विरोधी पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजीत मोरे आणि हरिश तावडे उपस्थित होते. यावेळी संजय शिंदे हे वाहन चालकाच्या बाजूला बसले होते. तर, वाहनाच्या मागील निलेश मोरे, अभिजीत मोरे आणि हरिश तावडे हे अक्षय शिंदे याला ताब्यात घेऊन बसले होते. संजय शिंदे यांनी निघताना त्यांच्या पिस्तुलमध्ये पाच राऊंड लोड केले होते. पोलिसांचे वाहन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता, निलेश मोरे यांनी संजय शिंदे यांना मोबाईलवर संपर्क साधला. अक्षय शिंदे हा शिवीगाळ करत आहे. तसेच ‘मला परत कशासाठी घेऊन जात आहात? मी काय केले आहे?’ असे बोलू लागल्याचे मोरे यांनी संजय शिंदे यांना सांगितले.

हेही वाचा : Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

त्यानंतर संजय शिंदे यांनी वाहन थांबविले. अक्षय शिंदे याला शांत करण्यासाठी संजय शिंदे हे वाहनाच्या मागील बाजूस आले. वाहन मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आले असता, अक्षय शिंदे याने अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेले पिस्तुल खेचण्यास सुरूवात केली. निलेश मोरे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘मला जाऊ द्या..’ असे म्हणत त्याने पोलिसांशी झटापट सुरू केली. या झटापटीत निलेश मोरे यांचे पिस्तुल लोड झाले. त्यामुळे एक गोळी निलेश यांच्या मांडीमध्ये घुसली. त्यानंतर अक्षय शिंदे याने त्यांची पिस्तुल घेऊन इतर पोलिसांच्या दिशेने रोखली. तसेच दोन गोळ्या झाडल्या. अक्षय याची उद्विग्न देहबोली पाहून संजय शिंदे यांनी तात्काळ स्वसंरक्षणार्थ त्यांच्या कडील पिस्तुलीने एक गोळी अक्षयच्या दिशेने झाडली. यात अक्षय जखमी होऊन खाली पडला. याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे की, अक्षय शिंदे याच्यावर पोलिसांनी स्वरक्षणार्थ कारवाई केली.

याप्रकरणात आता अक्षय शिंदेविरोधात हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चकमकीनंतर अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेतून विधानसभेसाठी इच्छुकांना खासदार डॉ. शिंदे यांची तंबी

अक्षय शिंदे याने पोलिसांवर स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईमध्ये मरण पावला आहे. त्यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय शिंदे विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २६२, १३२,१०९, १२१ तसेच शस्त्र अधिनियम कलम २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस