ठाणे : गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भिवंडी काल्हेर भागातील एका अल्पवयीन मुलाची चाॅपर आणि कोयत्याने हत्या करून त्याचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. १९ वर्षीय दोन तरुणांनी पूर्ववैमन्यस्यातून ही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. बेपत्ता मुलाच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या काॅलच्या आधारे तपास करून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आला आहे.
योगेश शर्मा (१६) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे तर, त्याच्या हत्येप्रकरणी आयुष झा (१९) आणि मनोज टोपे (१९) या दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. काल्हेर येथील आशापुरा गॅलेक्सीमध्ये योगेश शर्मा हा राहत होता. २५ नोव्हेंबरपासून तो बेपत्ता होता. त्याचा शोध लागत नसल्यामुळे त्याचे कुटूंबिय अस्वस्थ झाले होते. यातूनच त्यांनी २८ नोव्हेंबरला तो बेपत्ता असल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नारपोली पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला.
हेही वाचा : कल्याण : अपहरण करून विद्यार्थ्याकडील ऐवज लुटला
पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे काॅल रेकाॅर्ड तपासले. त्यात तो बेपत्ता झाला त्या दिवशी आयुष आणि मनोज यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली. यानंतर पोलिसांच्या पथकाने आयुष आणि मनोज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यात त्यांनी पूर्ववैमन्यस्यातून योगेशची हत्या केल्याची कबूली दिली. आयुष आणि मनोज यांचे योगेशसोबत वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी त्याला २५ नोव्हेंबरला काल्हेर भागातील रेतीबंदर येथे बोलावले. तिथे त्याची कोयता आणि चाॅपरने वार करून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह जमीनीत पुरला. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून या प्रकरणाचा उलगडा केला.