ठाणेः लोकसभेतील पराभवानंतर काही अंशी नाराज असलेल्या कपिल पाटील यांच्या निकटवर्तीयांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केले होते. कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण मतदारसंघांमध्ये पाटील यांच्या समर्थकांनी बंडखोरी करत अर्ज भरल्याने महायुतीत पेच निर्माण झाला होता. अखेर या दोन्ही उमेदवारांनी माघार घेत महायुतीच्या अधिकृत उमदेवाराचा प्रचार करण्याचे मान्य केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या दबावानंतर कपिल पाटील यांचीच तलवार म्यान झाल्याची चर्चा रंगली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यात अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत पाटील समर्थकांनी बंडखोरी केल्याचे चित्र होते. कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडे असल्याने येथून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर रिंगणात होते. येथे कपिल पाटील यांचे समर्थक वरूण पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. तर भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या विद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्यासमोर भाजपच्या पदाधिकारी स्नेहा पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज भरला होता. या दोन्ही अर्जांमुळे महायुतीपुढेच आव्हान निर्माण झाले होते. हे दोन्ही बंडखोर कपिल पाटील यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे कपिल पाटील यांच्यावर भाजपातील वरिष्ठांची नाराजी असल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत या ठिकाणी माघार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अर्ज मागे घेतला न गेल्याने उमेदवारी कायम राहिली. त्यानंतर स्नेहा पाटील यांच्याशी संबंधित गोदामांवर एमएमआरडीए प्रशासनाकडून कारवाईही करण्यासाठी पाऊले उचलली गेली. तर कपिल पाटील यांच्यावरही दबाव असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा : जिजाऊ संघटनेचा किसन कथोरेंना पाठिंबा; आमदार किसन कथोरे आणि निलेश सांबरे यांची भेट
अखेर दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतून वरूण पाटील यांनी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याचे जाहीर केले. यावेळी कपिल पाटीलही उपस्थित होते. तर शुक्रवारी कपिल पाटील आणि शिवसेनेचे प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहा पाटील यांनी माघार घेतल्याचे जाहिर करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ८ नोव्हेंबर रोजीच याबाबतचा निर्णय झाला होता. तो फक्त घोषीत करायचा होता, अशी माहिती कपिल पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. स्नेहा पाटील यापूर्वीच महायुतीच्या प्रचारात सक्रीय असल्याचेही पाटील पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळेे या दोन्ही निकटवर्तीयांच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी उपसलेली बंडाची तलवार अखेर म्यान झाल्याचे बोलले जाते. दुसरीकडे मुरबाड मतदारसंघातही पाटील समर्थक किसन कथोरे यांच्या प्रचारात उतरल्याचे चित्र आहे.