ठाणे : ठाणे लोकसभा भाजपसाठी वेगळे ठिकाण आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेसाठी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा टोकाचा आग्रह करत आहेत. ठाण्यात कधीकाळी भाजपचे रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे हे खासदार होते. सध्या ठाण्यात आमचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमची मागणी आहे, तो कार्यकर्त्यांचा अधिकार आहे असे सूचक वक्तव्य भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केले. गेल्याकाही दिवसांपासून ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दरेकर यांच्या या ‌विधानाने ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे लोकसभा अतिशय महत्त्वाची मानली जाते. गेल्याकाही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात भाजपचे बळ वाढत असल्याने आता ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवर भाजपने दावा करण्यास सुरूवात केली आहे. महायुतीच्या माध्यमातून शहरात शिंदे याची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) बैठका घेतल्या जात आहे. परंतु उमेदवार निश्चित होत नसल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची नावे पुढे येत आहेत. संजीव नाईक यांनी नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर भागात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासही सुरूवात केली आहे. तर संजय केळकर यांनी पक्षाने संधी दिली तर मी स्वतः आनंदाने लढायला तयार असून कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे शिंदे गटाच्या इच्छुकांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. आता विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या विधानानेही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : चार महिन्यांच्या बाळाचे बांगलादेशी तरूणीकडून अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरूणी ताब्यात

ठाण्यातील वर्तकनगर भागात भाजपने प्रशस्त कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय पाहण्यासाठी दरेकर ठाण्यात आले होते. राज्यात तीन ते चार ठिकाणी उमेदवारी निश्चित होणे शिल्लक आहे. तीन पक्ष एकत्र येऊन काम करतात. त्यावेळी उमेदवारी बाबत प्रश्न निर्माण होत असतात. आमचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाणे लोकसभेच्या जागेसाठी टोकाचा आग्रह आहे. ठाणे हे भाजपसाठी वेगळे ठिकाण आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यात संघटन उभे केले आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेची मागणी करणे कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. कधीकाळी रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे हे ठाण्याचे खासदार होते. सध्या ठाण्यात आमचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आहे असे दरेकर म्हणाले. आम्हाला लोकसभेची जागा मिळेपर्यंत कार्यकर्ते आग्रह धरतील. परंतु महायुतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही किंवा शिंदेचे पदाधिकारी उमेदवारासाठी काम करतील. जर ही जागा भाजपला मिळाली. तर शिंदे यांचे कार्यकर्ते ताकदीने काम करतील असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane bjp leader pravin darekar said bjp have right to demand of thane lok sabha seat css
Show comments