ठाणे – लुप्त होत चाललेल्या लोककलांना पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे, त्यासह अन्य कलांना मानाचे स्थान देऊन देशासमोर आपले राज्य संपन्न म्हणून समोर ठेवावे या उद्देशाने सांस्कृतिक विभाग प्रामाणिकपणे काम करत आहे, असे मत सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रविवारी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे दोन दिवसीय श्रमिक कलावंतांच्या कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, गेले तीन महिने हे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय याची विशेष जबाबदारी माझ्यावर दिली आहे. गेल्या ८० ते ८५ दिवसांत या विभागाच्या माध्यमातून मी १७० कार्यक्रम केले. संस्कृती संवर्धनाचे प्रचाराचे, प्रसाराचे, कलावंतांना संधी आणि स्थान देण्याचे काम या कार्यक्रमातून करत आहे. तर, येत्या आर्थिक वर्षात ३६५ दिवसात १२०० कार्यक्रमांची रचना केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्रमिकांच्या कलाकृतीला उपजत गुणी वृत्तीला श्रमिकाच्या कामांची जोड आहे म्हणून कार्यक्रमाचा सुगंध वेगळा आहे असे ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले. खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक सुरेंद्र वैद्य, उल्हास कारले, मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत आदी उपस्थित होते. तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत असे जवळपास १०० हून अधिक श्रमिक कलावंतांनी यावेळी कला सादर केल्या.

संयज राऊतांना सत्तेची भूक – ॲड. आशिष शेलार

सत्तेची भूक असल्याप्रमाणे संजय राऊत काम करत आहेत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. सत्तेत राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय असे दोन भाग आहेत. जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्याच्याबरोबर आम्ही आहोत. जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, अशी टीका देखील शेलार यांनी केली.

Story img Loader