ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणे येथील येऊर परिसर काच, प्लास्टिकमुक्त करण्याचे अभियान भाजप आमदार संजय केळकर यांनी रविवारपासून सुरू केले आहे. या अभियानात येऊरच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे तीन किलो मिटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून ३० मोठ्या पिशव्या भरून कचरा, काच आणि प्लास्टिक असा कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा ठाण्यात सुरु असून त्याचबरोबर महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप आमदार संजय केळकर यांनी येऊर परिसर काच, प्लास्टिकमुक्त करण्याचे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता.
लोकसहभागातून होणाऱ्या या उपक्रमात त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरिक आणि सामाजिक संस्थांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. आमदार संजय केळकर आणि १६ स्वयंसेवी संस्थांनी येऊरच्या जंगलात रविवारी स्वच्छता अभियान राबविले. येऊर म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला परिसर. नैसर्गिक ओढे, हिरवाईने बहरलेले जंगल. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये येथे काँक्रीटचे जंगल उभे राहिले असून ढाबा, हॉटेलची गर्दी झाली आहे. मद्यपींसाठी तर हे ठिकाण पार्टी आणि हुल्लडबाजीचे ठिकाण झाले आहे. परिणामी येऊरला बकालपणाचे स्वरुप प्राप्त होऊ लागले आहे.
हेही वाचा : पनवेलजवळ मालगाडी घसरल्याचा प्रवाशांना फटका, १० तासांपासून प्रवासी खोळंबलेल्या एक्सप्रेसमध्ये
जागो जागी फेकून देण्यात आलेल्या दारुच्या बाटल्या, खाद्यपदार्थ पाकीटे, पाण्याच्या बाटल्यांचा खच दिसतो. ठाणे शहराला प्राणवायू देणारे हे जंगल प्लास्टिक, काचांनी घायाळ बनले आहे. त्यातून या जंगलाची मुक्तता करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या तीन वर्षांपासून येथे स्वच्छता मोहिम राबवत आहेत. यंदाही त्यांनी ४०० स्वयंसेवकांसह येथे श्रमदान केले. पतंजली, हरिआली, ब्रम्हांड कट्टा, समर्थ भारत, रोटरी, इंस्ट्रीअल इस्टेट यासरख्या १६ संस्थांचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी सात वाजता येऊरच्या पायथ्यापासून या अभियानाला सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांझुडपांमधून यावेळी मोठया प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला. ३० ते ३५ मोठया बॅग भरून कचरा, काच व प्लास्टिक यावेळी गोळा झाला.