ठाणे : लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असतानाच, ठाण्यात भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या उत्सवात विचारे यांनी केळकर यांचा सत्कार केला असून त्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित होताच त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, टेंभी नाका तसेच विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला गेली २५ वर्षे उपस्थिती लावून देवीचे घेत असून देवी दर्शनाचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.
ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर, या जागेवर शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांनी दावा केल्याने महायुतीचा उमदेवार अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही. भाजपकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे आघाडीवर आहेत. तर शिंदे सेनेकडून माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक यांची नावे चर्चेत आहेत. त्यात लोकसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे सरनाईक यांनी ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वतः विरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागविली आहे. हे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झालेले हे पत्र शहरात चर्चेचा विषय बनले आहे. असे असतानाच, काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करणारे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विचारे हे ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने चैत्र नवराञोत्सव साजरा करतात. या उत्सवाला हजेरी लावून केळकर यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी विचारे यांनी केळकर यांचा सत्कार केला असून त्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित होताच त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, टेंभी नाका तसेच विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला गेली २५ वर्षे उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतो. देवी दर्शनाचा राजकारणाशी काही संबंध नसून तशी आमची संस्कृती नाही, असे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.