ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा प्रबळ केल्याने मुख्यमंत्री समर्थकांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातील विधानसभेचे दोन मतदारसंघ वगळले तर उर्वरीत चार मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघावरील दावा कायम ठेवला असून नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नावाची चाचपणी येथून केली जात असल्याची विश्वसनिय माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि लगतच्या पालघर या दोन जिल्ह्यात लोकसभेच्या तीन जागा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत यापैकी ठाणे, पालघर आणि कल्याण या मतदारसंघातून शिवसेना तर भिवंडीमधून भाजपचा उमेदवार निवडून आला होता. पावणेदोन वर्षांपुर्वी शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मात्र या चारही मतदारसंघातील गणित चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे सोबत आहेत. लगतच्या कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र डाॅ.श्रीकांत हे खासदार असले तरी येथील स्थानिक भाजप नेत्यांसोबत त्यांचे फारसे जमत नाही असेच आतापर्यत दिसून आले आहे. भिवंडीचे भाजप खासदार आणि केंद्रातील राज्यमंत्री कपील पाटील यांचे स्थानिक शिवसेना आणि भाजपतील काही नेत्यांसोबतही जमत नाही. पालघरची जागा तांत्रिकदृष्टया शिवसेनेकडे असली तरी या भागात असलेला हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा प्रभाव पहाता विद्यमान खासदार राजेंद्र गावित नेमके कोणत्या चिन्हावर लढतील याविषयी अजूनही स्पष्टता नाही. असे असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा प्रबळ ठरु लागल्याने दोन्ही पक्षातील शीतयुद्ध वाढू लागले आहे.
हेही वाचा : शहापूर जवळील शेरे गाव हद्दीत बिबट्याचा वावर?
शिवसेना-भाजपमध्ये खडाखडी?
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी बेलापूर, ऐरोली, ठाणे शहर या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार असून कोपरी-पाचपाखाडी (मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ), ओवळा-माजीवड्यात शिवसेनेचे आमदार आहेत. मिरा-भाईदरमध्ये गीता जैन या अपक्ष आमदार असल्या तरी त्यांचा मुळ पक्ष हा भाजपच आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव मोठा असल्याने या मतदारसंघावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. ठाणे भाजपकडे गेल्यास मुख्यमंत्र्यांसाठी तो मोठा धक्का ठरु शकेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो आपल्याकडे रहावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: आग्रही असून यावरुन दोन्हीकडून दबावतंत्राचा वापर सुरु असल्याची चर्चा आहे. ठाणे आणि रत्नागिरी-सिंधूदुर्ग या दोन मतदारसंघावरुन दोन पक्षातील चर्चेत खडाखडी सुरु असून त्यातून रामदास कदम आणि संजय शिरसाट या दोन शिवसेना नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घेतल्याचे बोलले जाते.
हेही वाचा : ठाणे: भरधाव रिक्षा दुभाजकाला धडकल्याने मोठा अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
नाईकांच्या नावाची चर्चा
दरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी कोण उमेदवार असावा याची चाचपणी भाजपकडून केली जात असून ठाण्याचे आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक तसेच भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे या तीन नावावर पक्षात आढावा घेण्यात आल्याचे समजते. नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नावाचा विचारही वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याची चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाईकांमधील यापुर्वीचे ताणलेले संबंध पहाता यामुळे मुख्यमंत्री समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. नवी मुंबईतही नाईक आणि मुख्यमंत्री समर्थकांमध्ये विस्तव जात नाही. या पार्श्वभूमीवर ही अस्वस्थता वाढू लागली आहे.
भाजप हा शिस्तीने चालणारा पक्ष असून वरिष्ठ जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असतो. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जो उमेदवार जाहीर होईल त्याच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते एकजुटीने काम करतील हा मला विश्वास आहे.
गणेश नाईक, भाजप आमदार