ठाणे : शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील मुख्य उड्डाणपूल, चौक, महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या संरक्षण भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक (कागदी स्टीकर) झळकू लागले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
आचारसंहिता सुरू असतानाही बहुतांश ठिकाणी हे फलक अद्यापही काढण्यात आले नाहीत. तर काही ठिकाणी कारवाई म्हणून प्रतिमांवर रंगकाम करून त्या रंगविण्यात आल्या आहेत. या फलकांमुळे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. दुसरीकडे आचारसंहिता सुरू असतानाही फलक काढले नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हे ही वाचा…अवकाळी पावसाचे संकट! राज्यात येत्या २४ तासात…
ठाणे शहरातील नौपाडा, साकेत, कळवा, खारेगाव या भागात भाजपच्या वतीने ‘देवाभाऊ’ अशा आशयाचे फलक (स्टीकर) मागील काही दिवसांपासून चिटकविले जात आहे. या फलकांवर ‘भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र’ असा उल्लेख आहे. तर लहान आकारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे छायाचित्र निदर्शनास येत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या आकाराचे छायाचित्र आहे. या फलकांमुळे शहरातील चौक, उड्डाणपूलांचा परिसर मागील काही दिवसांपासून विद्रूप झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सुभोभिकरणासाठी सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी ठाणे शहरातील संरक्षण भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली होती. महापालिकेने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. या रंगरंगोटीवर देखील हे फलक चिटकविण्यात आले आहेत. त्यामुळे या रंगरंगोटी केलेल्या ठिकाणाची शोभा निघून गेली आहे.
हे ही वाचा…गुन्हा नसताना १९ दिवस कारागृहात डांबले, ४३ वर्षे जुनी फाईल बंद करण्याच्या नादात पोलिसांनी…
विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजल्याने आता आचारसंहितेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेडून आता हे फलक काढण्यास सुरूवात झाली आहे. परंतु हे फलकासाठी वापरले जाणारे कागद व्यवस्थित निघत नसल्याने आता प्रतिमा असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करण्याची वेळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही या फलकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकारावरून सुजान ठाणेकर नाराजी व्यक्त करत आहेत. केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवित असताना, सत्ताधाऱ्यांनीच अशा पद्धतीने शहराचे विद्रूपीकरण करण्यास सुरूवात केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.