ठाणे : जुन्या ठाण्यातील पूनर्विकास प्रकल्पामध्ये नागरिकांच्या फसवणूकी प्रकरणी बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके याच्याविरोधात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकरणातून त्याला ठाणे न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. कौस्तुभ कळके आणि त्याच्या भागीदारांनी मे. जोशी एंटरप्रायजेस या नावाने बांधकाम कंपनी सुरू केली होती. जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या नौपाडा, चरई आणि पाचपाखाडी भागात अनेक इमारती जुन्या तसेच मोडकळीस आल्या होत्या. या इमारतींच्या पूनर्विकासाची कामे मे. जोशी एंटरप्रायजेस या कंपनीने हाती घेतली होती. परंतु भागीदारीमध्ये वाद निर्माण होऊ लागले. त्यानंतर पूनर्विकास प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना मासिक भाडे ठरवून देण्यात आले होते. ते मासिक भाडे देखील मिळत नव्हते.
कळके आणि त्याच्या भागीदारांनी पूनर्बांधणीतून तयार होणाऱ्या सदनिका देखील परस्पर विक्री केल्या होत्या. याप्रकारानंतर पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक झालेल्या नागरिकांनी कळके विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. एप्रिल महिन्यापासून त्याच्याविरोधात एकूण नऊ गुन्हे दाखल होते. या प्रकरणांचा तपास ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. कळके याच्यावतीने वकील शैलेश सडेकर आणि त्यांचे सहकारी वकील शुभम कानडे हे काम पाहात होते. कळके याला जून महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने प्रत्येक गुन्ह्यात जामीन गेला. नुकतीच शेवटच्या प्रकरणातही जामीन मिळाला आहे अशी माहिती वकील शैलेश सडेकर यांनी दिली.