ठाणे – येथील खारकरआळी परिसरात धोकादायक स्थितीत असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. ही इमारत रिकामी असल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या इमारतीच्या बाजूला दोन घरे असून त्या घरातील कुटूंबांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तात्पुरत्या स्वरुपात दुसरीकडे स्थळांतरित करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
जांभळी नाका जवळ असलेल्या खारकरआळी परिसरात ओमसागर अपार्टमेंट आहे. ही इमारत चार मजली असून ३८ वर्षे जुनी आहे. ही इमारत अति धोकादायस्थितीत असल्यामुळे सुमारे तीन वर्षांपूर्वी या इमारतीतील रहिवाशांनी इमारत रिकामी केली होती. या इमारतीतील चौथ्या मजल्यावरील एका खोलीतील खिडकीचा काही भाग रविवारी रात्री कोसळला. तसेच खिडकीतील लोखंडी ग्रील तुटून वरती लटकत होती. तर, बाजूचा उर्वरित भाग देखील धोकादायक स्थितीत होता. या ओमसागर इमारतीच्या बाजूला दोन घरे असून सुरक्षतेच्या कारणास्तव सदर दोन्ही घरे तात्पुरत्या स्वरूपात खाली करण्यात आली असून सदर घरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आपली राहण्याची सोय आपल्या नातेवाईकांकडे केली आहे.
घटनेची माहिती मिळताच यंत्रणा घटनास्थळी
या घटनेची माहिती मिळताच नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यालयीन अधीक्षक प्रवीण भोईर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी धोकादायक असलेली खिडकीची लोखंडी ग्रील अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आली आहे.तसेच या सोसायटीजवळ सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांकडून धोकापट्टी बांधून बॅरीगेटिंग करण्यात आले आहे.