ठाणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड याने प्रेयसीच्या मारहाण करत कारची धडक देऊन तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत तरुणीने घोडबंदर येथील कासारवडवली भागात घडलेल्या हा घटनाक्रम समाजमाध्यमांवर मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
घोडबंदर येथील वाघबीळ भागात २६ वर्षीय पिडीत तरुणीने राहते. ती नवी मुंबई परिसरात सलुनचा व्यवसाय करते. अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पिडीतेने केला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजीत याने घोडबंदर येथील एका हाॅटेलजवळ भेटण्यास बोलावले. तिथे गेल्यानंतर तो बोलला नाही. यावरून झालेल्या वादातून त्याने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच डाव्या हाताला चावा घेतला. त्याचा मित्र रोमिल पाटील यानेही शिवीगाळ केली. यानंतर अश्वजीतच्या कारमध्ये ठेवलेली बॅग व मोबाईल घेत असताना कारचालक सागर शेळके याने कारने धडक दिली. यात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील हाड मोडले आहे. तसेच शरीरावर दुखापत झाली आहे, असे पिडीत तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : डोंबिवलीत आगरी महोत्सवाला प्रारंभ; आगरी तरूणांना नोकरी, व्यवसायाच्या वाटा निवडण्याचे आवाहन
तसेच समाजमाध्यमांवरही तिने घडलेल्या हा घटनाक्रम मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे. उजवा पाय तुटला आहे आणि त्याची शस्त्रक्रिया करावी लागली. संपूर्ण शरीरावर जखमा आहेत, हातावर, पाठीवर आणि पोटात खोलवर जखमा आहेत. किमान ३-४ महिने अंथरुणाला खिळून राहीन आणि त्यानंतर अजून ६ महिने चालण्यासाठी आधार घ्यावा लागेल. मी कुटुंबातील मुख्य कमावती सदस्य आहे, अशी व्यथा तिने समाजमाध्यमांवर मांडली आहे. तिच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांचे जिवीतास किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोचवणे, धमकाविणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या संदर्भात अश्वजित गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हेही वाचा : डोंबिवलीत कुत्र्याची पिल्ले अंगावर भुंकली म्हणून मालकाला कराटेपटुकडून मारहाण
“मी अश्वजीतला मागील साडे चार वर्षांपासून ओळखते. त्यादिवशी मध्यरात्री आम्ही मित्रांसोबत होतो. त्यावेळी तो मला टाळत होता. तसेच मी त्याला अडवित असताना त्याने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या अपघातात मला गंभीर दुखापत झाली आहे. मी जो घटनाक्रम दिला तो पोलीस तक्रारीत नमुद नाही. त्यामुळे मला पुन्हा माझा जबाब नोंदवायचा आहे. या प्रकरणात ३०७ कलमंतर्गत गुन्हा दाखल करायचे आहे”, असे पीडित तरुणीने सांगितले.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी ठप्प, महास्वयंम पोर्टलचा सर्व्हर संथगती
“पिडीतीचे सविस्तर जबाब नोंदवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे कासारवडवली पोलिस ठाण्यात भादवी कलम ३२३, २७९, ३३८, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा सविस्तर तपास सुरू आहे. तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज, साक्षीदार आणि अन्य बाबींचा आम्ही सविस्तर तपास करीत आहोत. पिडीतेने ज्या काही बाबी मांडल्या आहेत, त्या समोर आल्यावर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.” – अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच