डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील एक आणि एक-ए फलाटांमधील कोपर बाजुकडील रेल्वे मार्गिकांमधून दररोज प्रवासी, विद्यार्थी, त्यांचे पालक मधला मार्ग म्हणून ये-जा करतात. रेल्वे जिने चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी प्रवासी रेल्वे मार्गिकेतील मधल्या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या भागात संरक्षित कठडे उभारुन रेल्वेने प्रवासी वाहतुकीला अडथळा करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
रेल्वे मार्ग ओलांडून प्रवास करणे रेल्वे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक प्रवासी या कायद्याकडे दुर्लक्ष करुन दररोज रेल्वे मार्गातून ये-जा करतात. डोंबिवली रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात असतात. गस्तीवरील हे पोलीस प्रवाशांच्या रेल्वे मार्गातून येण्याच्या जाण्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा गैरफायदा प्रवासी घेतात. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या कोपर बाजुकडील रेल्वे मार्गातून प्रवाशांची वर्दळ असते.
हेही वाचा : ठाण्यात ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी
डोंबिवली पूर्व, पश्चिम येजा करण्यासाठी स्कायवाॅक, सरकते जिने अशा सुविधा रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. तरीही अनेक प्रवासी विशेष म्हणजे अनेक पालक आपल्या लहान शाळकरी मुलांना घेऊन या रेल्वे मार्गातून ये-जा करतात. रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या सर्व प्रवाशांना अडवून रेल्वे तिकीट तपासणीस, स्टेशन मास्तर, गस्तीवरील पोलीसांनी समज द्यावी. रेल्वे मार्गातून त्यांना येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी काही जागरुक प्रवासी करत आहेत. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आठवड्यातून दोन ते तीन अपघात होतात.