ठाणे : बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नळजोडण्यांवर बसविलेले जलमापके चोरून नेण्याचे प्रकार सुरूच असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये ३ हजार १५५ जलमापकांची चोरी झाली असून या चोरट्यांमुळे नवीन जलमापकांसाठी पैसे भरावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच या चोऱ्यांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढत असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होतो. नळजोडणीधारकांकडून ठराविक रक्कम देयकापोटी घेण्यात येत होती. यामुळे काही नागरिक पाण्याचा बेसुमार वापर करताना दिसून येत होते. अनेक ठिकाणी रस्ते आणि वाहने धुण्यासाठी नागरिक पाण्याचा वापर करत होते. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्येही यासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाले होते. त्यावेळेस असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. यामुळे बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार, २०१९ मध्ये शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्या सुरुवात झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात १ लाख १३ हजार ३२८ नळ जोडण्या असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक नळजोडण्यांना पालिकेने जलमापके बसविले आहेत. तसेच नळजोडणीधारकांकडून जलमापकाद्वारे देयकांची वसुली करण्याचे कामही सुरू केले आहे. परंतु जलमापके चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत १ हजार ५४१ जलमापके चोरीला गेल्याची बाब दोन वर्षांपुर्वी समोर आली होती. त्यामध्ये सर्वाधिक चोरीचे प्रमाण कळवा परिसरात होते. याठिकाणी ५९४ जलमापकांची चोरी झाली होती. ही जलमापके भुरटे चोर चोरून नेत असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून सातत्याने समोर आले होते. गेल्या दोन वर्षात जलमापके चोरीच्या आकड्यात दुपटीने वाढ झाली असून गेल्या दोन वर्षात १ हजार ६४१ जलमापके चोरीला गेली आहेत. एकूणच २०१९ पासून म्हणजेच गेल्या सात वर्षात शहरात ३ हजार १५५ जलमापके चोरीला गेली असून त्यात कळव्यात जलमापके चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. जलमापकामध्ये असलेला पितळचा धातू विकून चारशे ते पाचशे रुपये मिळत असल्याने ही चोरी केली जात आहे. जलमापक चोरीला गेल्यानंतर ग्राहकांना नवीन जलमापक बसवावे लागते आणि त्यासाठी ग्राहकांना ७ हजार २५० शुल्क भरावे लागते. यामुळे ग्राहकही हैराण झाले आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

प्रभाग समिती आणि चोरीला गेलेले मीटर

कोपरी-नौपाडा २६९
उथळसर ५७
लोकमान्य-सावरकर २९२
वागळे इस्टेट ६३१
वर्तकनगर ३४
माजीवाडा-मानपाडा ५७
कळवा ९३६
मुंब्रा ४६४
दिवा ४१५
एकूण ३१५५

Story img Loader