ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात २०२४ या वर्षभरात ८०८ आगीच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा या शहरांचा समावेश होतो. या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. यात आठ अग्निशमन केंद्रे असून ९८ अग्निशामक वाहने आहेत. असे असले तरी शहरात मागील काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात ८०८ आगीच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार, तांत्रिक कारणे, गॅस गळती आणि ज्वलनशील पदार्थांच्या चुकीच्या हाताळणीमुळे आगीची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात सर्वाधिक २१२ आगींच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत ८२ आगी लागल्या आहेत. त्याचप्रमाणे, ५० टक्के घटनांना कचऱ्याचा हलगर्जीपणा आणि शॉर्ट सर्किट कारणीभूत ठरले आहे. जून महिन्यात घडलेल्या एका घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
हे ही वाचा… परवानग्यांशिवाय २७०० कोटींचे कंत्राट, ठाणे खाडी किनारामार्गाचे गौडबंगाल; निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह
शहरातील मोठया आगीच्या घटना
वागळे इस्टेट येथील खाद्यपदार्थांच्या कंपनीत मोठी आग लागली होती. तसेच ऑक्टोबर मध्ये दिवा येथील दुध विक्रीच्या दुकानाला मोठी आग लागली होती. या मोठ्या घटनेत जीवितहानीची घटना रोखण्यात यश आले. जून महिन्यात तुळशीधाम भागातील एका गृहसंकुलामध्ये चौथ्या मजल्यावर आग लागली होती त्यामध्ये ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
आग रोखणे, लोकांचा जीव वाचवणे हे आमचे काम असते. परंतु नागरिकांनी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. गॅस गळती, वातानुकूलित यंत्रणांची देखभाल दुरूस्ती करणे आवश्यक आहे. – यासिन तडवी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ठाणे महापालिका
कचऱ्यामुळे लागणाऱ्या आगी टाळण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. तसेच उंच इमारतींच्या अग्निशमन व्यवस्थेची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.- गिरीष झळके, मुख्य अग्निशमक अधिकारी, ठाणे महापालिका
आगीच्या घटनांची महिन्यानुसार आकडेवारी
१) जानेवारी – ७३
२) फेब्रुवारी – ८०
३)मार्च -११२
४)एप्रिल – ११६
५)मे – ७७
६)जुन – ४८
७)जुलै – ३६
८)ऑगस्ट – ३२
९)सप्टेंबर – ३९
१०)ऑक्टोबर – ४४
११)नोव्हेंबर – ८२
१२)डिसेंबर – ६९