ठाणे येथील माजीवडा भागातील सिद्धार्थनगर परिसरातील एका इमारतीजवळ गुरुवारी पहाटे आग लागली. या आगीत एका दुकानातील सीसीटीव्ही, संगणक, इतर साहित्य तसेच परिसरातील तीन दुचाकी जळून नुकसान झाले.
माजीवडा येथील सिद्धार्थनगर परिसरात सज्जनगड अपार्टमेंट ही तळ अधिक ६ मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर मे. जी एस कंपुनेट हे दुकान आहे. गुरुवारी पहाटे सव्वा चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास मे. जी एस कंपुनेट या दुकानाला आणि त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन दुचाकी वाहनांना आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तातडीने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. ही आग ५ वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी दुकानातील सीसीटीव्ही, संगणक आणि इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. याशिवाय तीन दुचाकी जळून नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.