ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी तसेच, बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग या दोन प्रकल्पांच्या कामात २,७६८ वृक्ष बाधित झाले असतानाच, त्यापाठोपाठ आता आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गाच्या कामात हरीत जनपथावरील वृक्ष बाधित होणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. या प्रकल्पात नेमकी किती वृक्ष बाधित होतील, याचे सर्वेक्षण पालिका प्रशासनाने सुरू केले असून या सर्वेक्षणानंतरच बाधित वृक्षांचा आकडा समजू शकणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून विविध नागरी प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. यामध्ये शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवनवीन रस्ते मार्गांची निर्मीती केली जात आहे तर, काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे केली जात आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे प्रकल्प राबविले जात असले तरी या प्रकल्पांचा फटका शहरातील हरित क्षेत्राला बसताना दिसून येत आहे.

घोडबंदर येथील कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामात २ हजार १९६ तर, बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग या प्रकल्पांच्या कामात ५७२ असे एकूण २,७६८ वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी १,९५६ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे, तर ८१२ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या कामासाठी पालिकेने ठेकेदार नियुक्त करण्याकरीता निविदा काढून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात केल्याचे चित्र आहे. असे असतानाच, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गाच्या कामात हरीत जनपथावरील वृक्ष बाधित होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आनंद नगर ते साकेत असा उन्नत मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात येणार आहे. या कामासाठी प्राधिकरणाने काही दिवसांपुर्वी माती परिक्षणाचे काम सुरू केले असून यासाठी तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत असलेल्या हरित जनपथावर जागोजागी लोखंडी पत्रे लावून खोदाई करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता या प्रकल्पात नेमकी किती वृक्ष बाधित होतील, याचे सर्वेक्षण पालिका प्रशासनाने सुरू केले असून या सर्वेक्षणानंतरच बाधित वृक्षांचा आकडा समजू शकणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे कोट्यावधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या जनपथावर गंडांतर येण्याबरोबरच या मार्गावरील वृक्षांचा हरित पट्टा आता कमी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आनंद नगर ते साकेत असा उन्नत मार्गाचा प्रस्ताव आमच्या विभागाकडे प्राप्त झाला असून यामध्ये किती वृक्षबाधित होतील, याचे आम्ही सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणानंतरच किती वृक्ष बाधित होणार हे सांगता येईल. – मधुकर बोडके उपायुक्त, ठाणे महापालिका