ठाणे : हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही सुट्टी जाहीर केली आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला. गुरुवार सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही वाहत होता. त्यातच हवामान विभागाने गुरूवारी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी सकाळी सुट्टी जाहीर केली. ठाणे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनुसार ठाणे जिल्हा परिषदेने शाळा आणि महाविद्यालय सुट्टीचे आदेश जारी केले होते. हे आदेश येण्यापूर्वी सकाळच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांचे वर्ग भरले होते. त्यामुळे आदेश येताच या वर्गातील विद्यार्थांना घरी सोडण्यात आले. तर, दुपार सत्रातील शाळा बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यात पुढील २४ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज, शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा : ठाण्यात पावसामुळे पोलिस भरती पुढे ढकलली
ठाणे शहरात गुरुवार पहाटेपासूनच पाऊस सुरू असून एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी संबंधितांना यावेळी दिले. या आदेशानुसार ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे – पवार यांनी परिपत्रक काढले असून ते शहरातील शासकीय आणि खासगी शाळा मुख्याध्यापकांना पाठविले आहे.