ठाणे : शहरातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल झाले आहेत. रात्रीच्या वेळेत वातावरणात गारवा जाणवत असला तरी दिवसा मात्र तापमानात मोठी वाढ होऊन ऊन्हाच्या झळा बसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमान चाळीशी पार गेल्याने दिवसा अंगाची काहीली होत आहे. तर, किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले असून यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळेत गारवा जाणवत आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
यंदा थंडीचा हंगाम लवकर संपणार असल्याचे अंदाज पर्यावरण तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहेत. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. शहरात सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत आहे. पहाटेपर्यंत हा गारवा कायम असतो. परंतु सकाळनंतर मात्र तापमानात मोठी वाढ होत असल्याचे पालिकेच्या तापमान केंद्राद्वारे समोर आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सहा तापमान केंद्राची उभारणी पालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी केली आहे. डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मुंब्रा अग्निशमन केंद्र, दिवा प्रभाग समिती कार्यालय, ठाणे महापालिका मुख्यालय, विटावा येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ७२ आणि घोडबंदर येथील ट्रॅफिक पार्क याठिकाणी ही तापमान केंद्र आहेत. यातील डाॅ. काशीनाथ नाट्यगृह येथील केंद्र बंद आहे तर, उर्वरित पाचही केंद्र सुरू आहेत. याठिकाणी दररोज नोंद होणाऱ्या तापमानाची पालिका प्रशासनाकडून नोंद घेतली जाते. याच तापमान केंद्राच्या आधारे गेल्या तीन दिवसातील तापमानाची आकडेवारी पहाता शहराचे तापमान चाळीशी पार गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.
हेही वाचा : दोन वर्षीय मुलीला मिळाली दृष्टी, ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयात पार पडली मोतीबिंदू शस्त्रक्रिया
तापमान आकडेवारी
ठाणे शहराचे तापमान ८ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस इतके होते. परंतु त्यानंतर तापमानात मोठी वाढ होताना दिसून आली आहे. ९ फेब्रुवारीला शहराचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. १० फेब्रुवारीला शहराचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ११ फेब्रुवारीला शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले, अशी माहिती ठाणे महापालिका प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.