ठाणे – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा योजनेच्याअंतर्गत कटाई नाका ते मुकुंद परिसरापर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांचा पाणी पुरवठा गुरूवारी २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ठाण्यात डास प्रतिबंधाची जबाबदारीही गृहसंकुलांवरच
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतामार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामध्ये एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण, मुंबई महापालिका आणि महापालिकेची स्वत:ची योजना या चार स्त्रोतांचा समावेश आहे. यातील एमआयडीसीकडून १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. हे पाणी मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा आणि वागळे इस्टेटमधील काही भागात वितरीत केले जाते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्याअंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीवरील कटाई नाका ते मुकुंद परिसरापर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी गुरूवार २६ डिसेंबर रोजी रात्री १२ ते शुक्रवार २७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१ चा काही भाग वगळता ) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये तसेच वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.