ठाणे : प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ ठेवायचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे निर्देश आयुक्तांना दिल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. ठाण्याला आवश्यक असलेले वाढीव पाणी देण्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे येथील वर्तकनगर भागात प्रस्तावित असलेल्या ‘भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे’ भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचा ऑनलाईनद्वारे शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुंबई, ठाण्यातील प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुंबईत प्रदूषण वाढत असल्याने मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना एक हजार पाण्याचे टँकर भाड्याने घेण्यास सांगून दररोज मुंबईतील रस्ते धुण्याचे आदेश दिले आहेत. त्याचधर्तीवर ठाण्यातही रस्ते पाण्याने धुण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत. परंतु यासाठी पिण्याचे पाणी वापरू नका तर, केवळ प्रक्रिया केलेले पाणी वापरा अशा सूचनाही दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : विश्वचषकामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवली,उल्हासनगर भागात एलईडी स्क्रिनचा तुटवडा; चढे दर देऊनही स्क्रिन मिळेना
ठाण्यात पुर्वी विहीरीतील पाण्याचा वापर केला जात होता. परंतु या विहिरी आता प्रदूषित झाल्या आहेत. ज्या विहीरींनी आपली तहान भागवली. त्या विहीरींना विसरू शकत नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे या जुन्या विहिरी पुनरुज्जीवित करण्याचे काम सुरू केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या विहिरी स्वच्छ झाल्यास पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यात मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. रस्ते रुंदीकरण झाले आहेत. सध्या प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील दुभाजकामध्ये शक्य असल्यास झाडे लावण्याच्या सूचना केल्या आहेत. ठाणे शहरात धोकादायक इमारतींचा टप्प्याटप्प्याने पूनर्विकास करून ठाणेकरांना हक्काचे घर मिळवून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर, कृष्णा आदिनाथ मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक प्रकल्प बंद पडले होते. त्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली. नवे प्रकल्प आम्ही हाती घेतले. असे असतानाही काहीजण आरोप प्रत्यारोप करत असतात. परंतु मी टिकेकडे लक्ष देत नाही. लता मंगेशकर यांच्या गाण्यामध्ये ‘मार दिया जाये की छोड़ दिया जाये, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाये’ अशी ओळ आहे. मी पण सोडून देतो. हेच आम्हाला बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी शिकवले आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
हेही वाचा : कल्याण: दिवाळीसाठी नातेवाईकांकडे गेली अन् परतलीच नाही, पुष्पक एक्स्प्रेसमधून १५ वर्षीय मुलीचं अपहरण
सध्याच्या राजकारणात सर्वच बेसूर सुरू आहे. रोज सकाळी उठून कावळे काव-काव करत आहेत. संपूर्ण दिवस ही काव-काव सुरू असते. कावळ्यांच्या या कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे अशी टिकाही त्यांनी विरोधकांवर केली. ठाण्याचे बदलते रूप बघून मला आनंद वाटला. या ठाण्याला साजेशी इमारत लता मंगेशकर गुरुकुलसाठी आता उभारली जाणार आहे. त्याचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी या सोहळ्यात केले. तसेच, हे संगीत विदयालय चालवण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल त्यांनी आभार मानले. ठाण्याप्रमाणेच मुंबईचे रूप बदलावे, असेही त्या म्हणाल्या. त्यावर मुंबईतही रस्ते स्वच्छ ठेवणे, सुशोभीकरण तसेच इतर प्रकल्पांची कामे सुरू असून तिथेही लवकरच बदल दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.