ठाणे : दगडी भिंतीचे कुंपण, लोखंडी जाळीचे प्रवेशद्वार, कौलांचे छप्पर असलेले कार्यालय आणि ठेवणीच्या जागेवरील आनंद दिघे यांची खुर्ची आणि टेबल. समस्या घेऊन येणाऱ्यांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या, मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच उभी असलेली दिघे यांची गाडी आणि कार्यालयालगत अगदी हुबेहूब वाटावी अशी वि.द.आपटे यांचे निवासस्थान असलेली जुनी एक मजली इमारत. ठाण्यातील कोलशेत भागातील कल्पतरु गृहसंकुलात धर्मवीर-२ चित्रपटाच्या मुहूर्ताप्रसंगी उभारण्यात आलेले ‘आनंदाश्रमा’तील हे नेपथ्य सोमवारी अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आनंद दिघे यांचे ‘शिष्योत्तम’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अगदी हुबेहुब वाटणाऱ्या या आश्रमाला भेट दिली आणि त्यानंतर काही काळ याठिकाणी उपस्थित असलेले सर्वच जुन्या आठवणीत रमल्याचे पहायला मिळाले.
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे टेंभीनाका परिसरात कार्यालय आहे. आनंद आश्रम या नावाने हे कार्यालय ओळखले जाते. या कार्यालयातूनच ते जिल्ह्यातील शिवसेनेचा कारभार हाकत होते आणि त्याचबरोबर येथूनच ते समाजकार्य करीत होते. त्यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे तसेच इतर स्थानिक नेत्यांनी आनंद दिघे यांच्यासोबत काम केले, ते याच कार्यालयातून. शिवाय, अनेकांच्या समस्यांचे निराकारणही याच कार्यालयातून झाले. यामुळे नेत्यांसह जिल्ह्यातील शिवसैनिकांचे हे कार्यालय श्रद्धास्थान मानले जाते. काही वर्षांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका कार्यालयाचे नुतनीकरण केले. कार्यालयातील रचनेत फार बदल न करता कार्यालयाला नवीन झळाळी देण्यात आली आहे. तसेच दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला.
हेही वाचा : “धर्मवीर दोन”मधून २०२४ची पायाभरणी? पहिल्यातून बंडाचे निशाण, दुसऱ्यातून नेतृत्वावर शिक्कामोर्तब?
टेंभीनाका येथील कार्यालयाचे नुतनीकरण झालेले असल्यामुळे त्याठिकाणी चित्रपटाचे चित्रिकरण करणे शक्य होत नव्हते. यामुळे ठाण्याच्या कोलशेत भागात धर्मवीर चित्रपटासाठी जुने आनंद आश्रम हुबेहुब उभारण्यात आले असून त्याठिकाणी आनंद दिघे यांच्या खोलीपासून ते अगदी तेथील वस्तु जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत. दगडी भिंतीची कुंपण, लोखंडी जाळीचा गेट, कौलांचे छप्पर, आनंद दिघे यांची खुर्ची आणि टेबल, त्या समोर समस्या घेऊन येणाऱ्यांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या, मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच उभी असलेली दिघे यांची गाडी आणि त्या बाजुला असलेली दुमजली इमारत, असे नेपथ्य चित्रपटासाठी करण्यात आले आहे. ‘धर्मवीर-२’ चित्रपट मुहूर्त कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील शिवसेनेचे अनेक नेते याठिकाणी आले आणि ते आश्रमातील जुन्या आठवणीत रमल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षाच; बारवीचे पाणी दीड वर्ष मिळणार नाही, एमआयडीसीची स्पष्टोक्ती
जुन्या आठवणीत रमले
धर्मवीर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी आनंद आश्रम पुर्णपणे पाहिले नव्हते. पण, सोमवारी ते आपल्या सहकार्यांसह ‘धर्मवीर-२’ चित्रपटाच्या मुहूर्त कार्यक्रमासाठी आले. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला हा कार्यक्रम आटोपला आणि त्यांनी त्यानंतर माघारी फिरत असतानाच हुबेहुब उभारलेले आश्रमाच्या आतील भाग पाहून ते जुन्या आठवणीत रमले. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या आणि अन्याय करणाऱ्यांना दिघे हे हंटरने मारायचे. तो हंटर कुठेय, असा प्रश्न शिंदे यांनी दिघे यांच्या खोलीची पाहाणी करताना निर्मात्यांना विचारला.
“नवीन आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच जातात. पण, धर्मवीर-२ चित्रपट मुहूर्त कार्यक्रमादरम्यान चित्रपटासाठी उभारण्यात आलेल्या आनंद आश्रमावर गेली आणि ते पाहाताना त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.” – मंगेश देसाई, निर्माता, धर्मवीर चित्रपट