ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदार संघांच्या जागेवर शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे सुरु असतानाच, शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र मतदार संघांमध्ये कामाला सुरूवात करत बैठकांचा सपाटा लावला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील माजी नगरसेवकांसह विभागप्रमुखांची बैठक बुधवारी आनंद आश्रमात पार पडली असून त्यात ठाणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक बूथवर मताधिक्य कसे वाढविता येईल, यासाठी पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजीत पवार गट) या तिन्ही पक्षांच्या महायुतीचे सरकार आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी मतदार संघाच्या जागा वाटपावरून स्थानिक पातळीवर मात्र वाद रंगले आहेत. अशाचप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात चित्र आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेकडून लढविण्यात येते. तर, भिवंडीची जागा भाजपाकडून लढविण्यात येते. शिवसेनेतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत.

हेही वाचा : “शरद पवार हे कालही आणि आजही श्रद्धेय आहेत पण…”, शरद पवारांचा फोटो काढण्यावरून आनंद परांजपे यांचे स्पष्टीकरण

ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. यामुळे शिंदेच्या शिवसेनेने याठिकाणी दुसरा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली. तर मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. पण, गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर दावे करण्यात येत आहेत. महायुतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपच्या स्थानिक नेत्यांना उत्तर देणे टाळण्यात येत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेने दबाबतंत्र अवलंबिणाऱ्या भाजपला जशास तसे उत्तर देण्याची रणनिती आखत ठाणे, भिवंडी, कल्याण या तिन्ही जागांवर दावा केला आहे.

हेही वाचा : कल्याणमधील ज्येष्ठ गायक गिरीश जोशी यांच्या दुचाकीची चोरी

तसेच शिवसेनेने या मतदार संघामधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. अशाचप्रकारे ठाणे महापालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुखांची संघटनात्मक बैठक बुधवारी आनंदाश्रम येथे पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैती यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली असून त्यात प्रत्येक बूथवर मताधिक्य कसे वाढविता येईल, यासाठी पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देण्यात आला आहे.

हेही वाचा : ठाण्यात आता निसर्ग वाचनालयांची उभारणी, ठाणे महापालिकेचा उपक्रम

“आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताने उमेदवार विजयी व्हावा, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुखांची संघटनात्मक बैठक बुधवारी आनंदाश्रम येथे बैठक घेऊन त्यांना प्रत्येक बूथवर कसे मताधिक्य घेता येईल, याबाबत कार्यक्रम देण्यात आला आहे”, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane cm eknath shinde shivsena starts preparation for thane lok sabha seat css