ठाणे : लोकसभा निवडणुकीत अप्रचार करूनही मशालवर धनुष्यबाण भारी पडला होता. या निवडणुकीत कोकणातून त्यांचा एकही खासदार निवडुण आला नसून विधानसभेतही त्यांची पुनर्रावृत्ती होईल. तसेच विधानसभा निवडणुकीत कामाच्या आणि विकासाच्या जोरावर महायुतीचा स्ट्राइक रेट हा सर्वात भारी असेल आणि महायुती विरोधकांना चारिमुंड्या चीत करेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ओवळा-माजीवडा मतदार संघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर टिका केली. महाविकास आघाडीने केलेले काम आणि महायुतीने सव्वा दोन वर्षात केलेले काम याची तुलना होईल आणि दुध का दूध, पाणी का पाणी होईल. कल्याणकारी योजना, विकास प्रकल्प राबविणाऱ्या महायुतीच्या बाजूने जनता उभी राहील आणि राड्यात महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेवर येऊन जनतेची सेवा करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत मशाल विरुद्ध धनुष्यबाण जिंकलेला आहे. या निवडणुकीत आम्ही मशाल विरोधात १३ जागांवर समोरासमोर लढलो आणि त्यातील सात जागा आम्ही जिंकल्या. अप्रचार आणि फसवणुक करूनही उबाठापेक्षा जास्त जागा जिंकल्यामु‌ळे मशालवर धनुष्यबाण भारी पडला आहे.

हेही वाचा…छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत साडेतीन कोटींनी वाढ

यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार चौकार आणि षटकार मारणार आहेत. विधानसभा निवडणुकीत कामाच्या आणि विकासाच्या जोरावर महायुतीचा स्ट्राइक रेट हा सर्वात भारी असेल आणि महायुती विरोधकांना चारिमुंड्या चीत करेल, असेही ते म्हणाले. लाडकी बहिण योजना विरोधकांच्या पोटात सलते आणि डोळ्यातही खुपते. ज्या योजना सुरु केल्या, त्या बंद पाडू, चौकशी करू असे विरोधक सांगतात. त्यामुळे जनता त्यांना साथ देणार नाही आणि त्यांचे सरकार येणार नाही. लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांचे सरकार आणण्याचे ठरविले आहे, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीला उबाठाची रणनिती समजली. त्यांनी ठाणे लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले. पण, त्यांना पळता भुई कमी पडली. त्यांना कोकणातही एकही जागा मिळाली नाही. बाळासाहेब आणि कोकणाचे नाते होते. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेब आणि जनतेशी बेईमानी केली. त्यामुळे कोकणातील जनतेने त्यांची साथ सोडली. एकही खासदार त्यांचा निवडुण आला नाही. आता एकही आमदार निवडूण येणार नाही, असेही ते म्हणाले.