ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी समाजमाध्यमावर मजकूर लिहीतो असे म्हणत ठाण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला तीन जणांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण करणारे शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्या ट्विटर खात्यावरून मारहाणीची चित्रफित प्रसारित करत ‘हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार’ असे म्हणत राज्य शासनाविरोधात टिका केली. मारहाण करणाऱ्यांविरोधात २४ तासांच्या आत कारवाई झाली पाहिजे. अन्यथा मारहाण करणारा शिवसेनेचा पदाधिकारी बंटी बाडकर याला पकडून आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
मारहाण झालेले गिरीश कोळी हे ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी गिरीश कोळी यांना तीन जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर ठाणे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर या मारहाणीचे चित्रीकरण प्रसारित केले. तसेच एक ट्विटही प्रसारित केले. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. त्यामुळे शिवसेनेचा उपविभागप्रमुख बंटी बाडकर आणि त्याचे सहकाऱ्यांनी कोळी यांना मारहाण करत माफी मागण्यास सांगितले. हे इतर कोणत्या पक्षाच्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी केले असते तर ते गुंड. मग पोलीस छळणार. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार. जेलमध्ये सडवणार. हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार. असे म्हटले आहे.
त्यानंतर गुरुवारी काँँग्रेसनेही कोळी यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव मनोज शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मारहाण करणारा बंटी बाडकर हा कोपरी येथील शिवसेनेचा उपविभागप्रमुख आहे. त्याच्याविरोधात २४ तासांच्या आत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. कारवाई झाली नाहीतर बंटी बाडकर याला पकडून आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा त्यांनी दिला. कोळी यांनी प्रसारित केलेल्या मजकूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्याचा उल्लेख केला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हेही वाचा… यंदा ठाणे जिल्ह्यात पाणी कपात नाही; बारवी धरणात मुबलक पाणी साठा
माझ्या समाजमाध्यमावरील संदेशात ‘चैत्र नवरात्रौत्सव म्हणजेच राजकीय आखाडाच झालाय. कोणीही आयोजित करतो’ असे लिहीले होते. यामध्ये मुख्यमंत्री किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचा उल्लेख नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन कोणीही दंडुकेशाही करत असेल तर सर्वसामान्य माणसाने रस्त्यावर फिरायलाच नको. मी ठाण्यात आगरी कोळी समाजाचेही नेतृत्त्व करतो. कोळी आणि आगरी समाजावरही हल्ला आहे. मला न्याय मिळावा. – गिरीश कोळी, पदाधिकारी, काँग्रेस.