ठाणे : ठाण्यातील नागरिकांना हक्काचे पार्क मिळावे यासाठी बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून कोलशेत भागात नमो सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. या सेंट्रल पार्कमध्ये नागरिक गर्दी करू लागले असल्याने वाहतुक कोंडी होऊन त्याचा फटका कोलशेत भागात वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरिकांना बसू लागला आहे. सेंट्रल पार्कला जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी शनिवारी आणि रविवारी असते. सुट्टीच्या दिवसांत देखील कोंडी होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोंडीमुळे परिसरात राहणारे नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. ढोकाळी, हायलँड भागात देखील या वाहतुक कोंडीचा परिणाम पाहायला मिळत आहे.
शहरातील घोडबंदर प्रमाणे कोलशेत भागात मोठे गृहप्रकल्प उभे राहीले आहेत. त्यामुळे येथील कोलशेत गाव, हायलँड, ढोकाळी भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढली आहे. येथील सदनिकांच्या किमती देखील कोटीच्या घरात गेल्या आहेत. असे असले तरी येथील ढोकाळी- कोलशेत रस्ता वाहतुकीच्या तुलनेत अरुंद आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर चालकांना कोंडीचा सामना करावा लागत असतो. येथील पार्कसिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या (कन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित केले आहे. ८ फेब्रुवारीला या सेंट्रल पार्कचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा : श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला
सेंट्रल पार्कमधील प्रवेशाला शुल्क आकारण्यात येत असले तरीही उद्यान पाहण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणात गर्दी करू लागले आहेत. सर्वाधिक गर्दी शनिवारी आणि रविवारी असते. या दिवसांत शहरातील विविध भागातून नागरिक त्यांच्या मोटारी, दुचाकी घेऊन येत आहेत. त्यामुळे मोठा भार या मार्गावर येऊ लागला असून वाहतुक कोंडीचे केंद्र हा मार्ग ठरू लागला आहे. वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना सुमारे अर्धा तास लागत आहे.
हेही वाचा : आमदार गणपत गायकवाड भाजपचे असते तर एवढे निर्घृण वागले नसते, शहरप्रमुख महेश गायकवाड यांची टीका
काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका आणि वाहतुक विभागाने कापूरबावडी येथून ढोकाळीच्या दिशेने वाहतुक करणारी मार्गिका बंद केली. त्यामुळे वाहन चालकांना हायलँड मार्गे प्रवास करावा लागतो. त्यामुळे सेंट्रल पार्कमुळे होणाऱ्या कोंडीचा परिणाम हायलँड आणि ढोकाळी मार्गावरही दिसू लागला आहे. कल्पतरू पार्कसिटीच्या रस्त्यावर देखील कोंडी असते. कोलशेत भागातील नागरिक कोंडीमुळे सांयकाळी बाहेर पडणे टाळू लागले आहेत. “सेंट्रल पार्कमुळे कोलशेत रोड परिसरात कोंडी होते. त्यामुळे येथे वाहतुक साहाय्यक उपलब्ध करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच येथील रस्ता रुंदीकरणासंदर्भात महापालिकेला कळविले आहे.” – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.