ठाणे : वर्षभरापूर्वी नेलेले कुलर खराब झाल्याने विक्रेता आणि त्याच्या भावाला तिघांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्याकाही दिवसांपासून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ठाणे, भिवंडी, मुंब्रा या भागातील विविध बाजारपेठांमध्ये कुलर विक्रीस आले आहेत. एसी यंत्रणाच्या किमती महाग असल्याने अनेकजण कुलर घेण्यास प्राधान्य देत असतात. कुलर खरेदी करण्यास अनेकांचा कल दिसून येतो. भिवंडी येथील धामनकर नाका परिसरात एका कुलर विक्रेत्याचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी ते दुकानात असताना एक व्यक्ती त्यांच्या दुकानात आला. त्याने विक्रेत्याला सांगितले हे कुलर वर्षभरापूर्वी नेले असून आता नादुरुस्त झाले आहे असे सांगितले. तसेच त्याने त्याबदल्यात विक्रेत्याकडून नवा कुलर मागण्यास सुरुवात केली.
त्यावर विक्रेत्याने या घटनेस एक वर्ष झाल्याने नवा कुलर बदलून देण्यास नकार दिला. विक्रेत्याने तो नादुरुस्त झालेला कुलर दुरुस्त करून देतो असेही सांगितले. पंरतु ग्राहक ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे विक्रेता आणि ग्राहकामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर तो ग्राहक तेथून निघून गेला. काहीवेळाने तो ग्राहक पुन्हा त्याठिकाणी आला. त्याच्यासोबत त्याचे दोन भाऊ देखील होता. तिघेही या दुकानातील एक कुलर जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले. यास विक्रेत्याने विरोध केल्याने ग्राहकाच्या भावाने त्यास बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली. विक्रेत्याचा भाऊ बचावासाठी आला असता, त्यालाही तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.