ठाणे : नवरात्रोत्सवात घटस्थापनेसाठी बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्यांचा वापर वर्षांनुवर्षांपासून केला जात आहे. परंतू, बाजारात नव्याने आलेल्या चिनी टोपल्यांमुळे यंदा या टोपल्यांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय टोपलीच्या किंमतीच्या दरात चिनी टोपली स्वस्त असल्यामुळे नागरिकांकडून चिनी टोपल्या खरेदी केल्या जात आहेत. यामुळे भारतीय टोपल्याच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे.
दरवर्षी नवरात्रौत्सवाच्या १५ ते २० दिवस आधीपासून जळगाव, भुसावळ येथून बांबू उत्पादक शेतकरी ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात दाखल होतात. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्यांना नवरात्रौत्सवात मोठी मागणी असते. हे शेतकरी या टोपल्यांची विक्री करण्यासाठी गेले २० वर्षांपासून शहरात येत आहेत. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपलीला गावाकडे फारसा भाव मिळत नाही. या टोपल्यांची चांगल्या दरात विक्री व्हावी या उद्देशाने हे शेतकरी शहरी भागात येतात.
हेही वाचा : डोंबिवलीत गरब्यासाठी दत्तनगर चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल
ठाणे जिल्ह्यात मुख्यत: ठाणे, डोंबिवली, कल्याण शहरात हे टोपली विक्रेते दिसून येतात. गावाहून येताना ते काही टोपल्या तयार करुन आणतात. या टोपल्याची कमतरता भासल्यास हे शेतकरी मुंबईतील परेल भागातून बांबू विकत घेतात. एका बांबूची किंमत १५० रुपये असते. या एका बांबूमध्ये मध्यम आकाराच्या ८ ते १० टोपल्या बनविल्या जातात. एक टोपली विनायला या शेतकऱ्यांना दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे टोपली तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि मेहनत यानुसार या टोपल्यांचे दर ठरविण्यात येतात. छोट्या आकारापासून ते मोठ्या आकाराच्या टोपल्या २५ ते १५० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहेत.
नवरात्रौत्सवाच्या काळात बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपलीत घटस्थापना करण्याची पारंपारिक पद्धत आहे. यामुळे नवरात्रौत्सावाच्या काळात बांबूच्या टोपल्यांना प्रचंड मागणी असते. परंतू, अलिकडे बाजारात चिनी बनावटीच्या टोपल्या विक्रीसाठी दाखल झाल्याचे दिसून येत आहेत. चिनी बनावटीच्या टोपल्यांचे दर बांबू पासून तयार करण्यात येणाऱ्या टोपलीच्या तुलनेत कमी आहेत. या टोपल्या दिसण्यास आकर्षित दिसतात. त्यामुळे चिनी टोपल्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्यांच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती जळगावहून आलेले टोपली विक्रेते प्रल्हाद मुळे यांनी दिली.
हेही वाचा : ठाणे : सिलिंडर भडक्यात जखमी महिलेचा मृत्यू
खर्च परवडेना…
गावात टोपली विक्रीमधून पुरेसा खर्च निघत नसल्यामुळे जळगाव-भुसावळहून काही कुटूंब मुंबई, ठाणे शहरात गेले अनेक वर्षांपासून येत आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश असतो. हे कुटूंब पंधरा ते वीस दिवस शहरातच वास्तव्यास असते. ज्याठिकाणी टोपल्यांची विक्री करतात, त्याच भागात त्यांचे वास्तव्य असते. टोपली विक्रीतून उत्पन्न मिळते त्यातूनच ते आपला दैनंदिन खर्च भागवत असतात. परंतु आता टोपल्यांच्या विक्रीत घट झाल्यामुळे हा खर्च परवडत नसल्याचे मत या शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.