ठाणे : उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आप अशा सगळ्याच पक्षांनी आता एकच रस्ता धरलाय, तो म्हणजेच धनुष्यबाणाची शिवसेना. बा‌ळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचाराचा हा धनुष्यबाण आहे. या शिवसेनेत कुणीही मालक आणि नोकर नसून ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे, असे विधान उपमुख्यमंमत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गुरूवारी पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलताना केले. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील आनंद आश्रमात गुरूवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नागपूर, कन्नड, मुंबईतील चेंबुर आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, वाडा, शहापूर या भागातील उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आप पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यानंतर शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांवर टिका केली. काहीजण म्हणत होते की, सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. पण, विधानसभा निवडणुकीत आपले ६० आमदार निवडुण आल्याने खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले. काही जणांना स्वप्न पडले होते. त्यांनी मंत्रीमंडळही तयार केले होते. हाॅटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकींग रद्द केले, असा टोला शिंदे यांनी लगावला.

हेही वाचा : ठाणे : थकीत कर वसुलीसाठी पालिकेने वाजविले ढोल ताशे, नौपाडा विभागात पालिका प्रशासनाकडून कारवाई

अडीच वर्षांपुर्वी बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार स्थापन केले. विकासाबरोबरच कल्याणकारी योजना राबविल्या. यामु‌‌ळे महायुतीचा बहुमताने विजय झाला. लाडकी बहिण, भाऊ, शेतकरी, युवक, जेष्ठ अशा सर्वांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो, त्याप्रमाणे विरोधक चारही मुंड्या चीत झाले, असेही ते म्हणाले. मी विधानसभेत म्हणालो होतो, देवेंद्र फडणवीस आणि मी असे आम्ही दोघे दोनशे आमदार निवडुन आणू नाहीतर गावाला शेती करायला जाऊ. पण आम्ही दोघांनी २३२ आमदार निवडुण आणले. निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने सावत्र भावांची जागा दाखवली आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसून टाकले. फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिले, अशी टिकाही त्यांनी केली. राज्यातील २ कोटी ३९ लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ओळख मिळाली असून ती कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. सीएम म्हणजे काॅमन मॅन असे मी म्हणायचो. आता उपमुख्यमंत्री असताना डिसीएम म्हणजेच डेडीकेटेड टू काॅमन मॅन असे म्हणतो, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane deputy chief minister eknath shinde on shivsena and other parties css