ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठाण्यात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाला रविवारी सकल धनगर समाजाने पाठिंबा दर्शविला. तसेच नोव्हेंबर महिन्यात धनगर समाजाच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शनिवारपासून सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा : ठाण्यात मराठा समाजाच्या नेत्यांकडून तटकरे यांना काळे झेंडे
रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक मोर्चे निघाले. तरी देखील सरकारने टिकणारे आरक्षण दिले नाही. असाच प्रकार धनगर समाजाबाबत सरकारने केला आहे. धनगर समाज ६५ वर्षांपासून अनुसूचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मोर्चे, आंदोलन करत आहे. आजपर्यंत सरकारने आरक्षण लागू केलेले नाही. त्यामुळे धनगर व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी ठाण्यात मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याचे सकल धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारने ५० दिवसाचा अवधी धनगर समाजाकडून मागितला होता. परंतु सरकारने काहीही केले नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात धनगर समाजाच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.