ठाणे : राज्यात शासनामार्फत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबात ठाणे जिल्ह्यातील काही शाळांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अभियाना अंतर्गत स्थानिक शिक्षण विभागाकडून शाळांचे करण्यात आलेले मूल्यांकन गांभिर्यपूर्वक केले नसल्याचा आरोप काही शाळा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा एकप्रकारे बट्याबोळ झाल्याची खंत ठाणे शहरातीस काही शाळांनी व्यक्त केली आहे.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यात राबविण्यात आले. या अभियानात राज्यातील हजारोच्या संख्येने शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये शासकीय आणि खासगी शाळांचाही समावेश होता. शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शासनाचा उद्देश होता. या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, महापालिका स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते.
हेही वाचा : ‘मुह मे मोदी और ठाण्यात भाजप बेनाम’, आमदार संजय केळकर यांची टीका
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महावाचन महोत्सव, शेती व तंत्रज्ञानाच्या आवडीसाठी माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता व आरोग्यासाठी स्वच्छता मॉनिटर टप्पा २, शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे उपक्रम, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास उपक्रम, तंबाखुमुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा असे विविध ३० उपक्रम या अभियानात राबविण्यात आले होते. हे सर्व उपक्रम कोणती शाळा अचूक पद्धतीने राबविल हे पाहण्यासाठी केंद्र स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालकांनी सर्वाधिक मेहनत घेतली. परंतू, या अभियानातील उपक्रमांचे मूल्यांकन करताना स्थानिक प्रशासनाने व्यवस्थित लक्ष दिले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या अभियानाबात ठाणे जिल्ह्यातील काही शाळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : ठाण्यातील उड्डाणपुलांवरील ध्वनीरोधकचे भाग चोरीला ?
ठाणे शहरात असलेल्या वर्तकनगर भागातील थिराणी शाळेत देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. परंतू, या अभियानात समाविष्ट असलेल्या उपक्रमांपैकी बहुतांंश उपक्रम या शाळेत फार पूर्वी पासून राबविण्यात येत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून आलेल्या मूल्यांकन समितीमार्फत योग्यपद्धतीने मूल्यांकन केला नसल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे. केवळ औपचारिकता म्हणून हे मूल्यांकन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील पत्र शाळा प्रशासनाने महापालिका शिक्षण विभागालाही दिले होते. या अभियानाचे पुनर्मूल्यांकन करुन शासनाच्या अभियानाचा आदर करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. परंतू, शिक्षण विभागाकडून शाळेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा : उल्हासनगरातील २७ हजार अनधिकृत बांधकामे नियमित ; केवळ १० टक्के दंड आकारणी; राज्य सरकारचा निर्णय
शासनाने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राबविण्यास सांगितलेल्या उपक्रमांपैकी काही उपक्रम आमच्या शाळेत यापूर्वीपासून राबविण्यात येत आहे. त्यामुळे आमची शाळा मूल्यांकनात पालिका स्तरावर येणे अपेक्षित होते. मात्र, मूल्यांकनासाठी आलेल्या समितीला या अभियानाबाबत फारसे ज्ञान नसल्याचे दिसून आले आणि त्यांनी केवळ औपचारिकता म्हणून हे मूल्यांकन केले आहे.
जालिंदर माने (मुख्याध्यापक, श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर, वर्तकनगर)