ठाणे : आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यातून १० हजार ४२९ बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांचा प्रवेश २८ फेब्रुवारी पर्यंत निश्चित करावा असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्रवेश अर्ज स्विकारण्याची मुदत २ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली.

त्यानुसार, १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ बालकांचे आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार ४२९ बालकांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली असल्याची माहिती आरटीई च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

यंदा ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महापालिका क्षेत्रातील ६२७ शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या असून ११ हजार ३२० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.

  • निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्र पडताळणी साठी तालुका आणि प्रभाग समिती स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • पडताळणी समिती कडे जाताना पालकांना मूळ कागदपत्रे आणि एक छायांकित प्रत घेऊन जायची आहे.
  • जर पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहू शकले नाही तर, त्यांना पुन्हा दोन संधी दिल्या जाणार आहेत.
  • पडताळणी समितीने संबंधित बालकांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यांनतर सदर बालकांना प्रवेश देण्याची सुविधा आरटीई संकेत स्थळावर केली आहे. तसेच पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही.
  • पालकांनी केवळ दूरध्वनी वरील संदेशावर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे.
  • विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
  • विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
  • विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला आणि सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास चुकीची माहिती भरुन दिशाभूल केल्या प्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद करण्यात येईल याची सर्व पालकांनी नोंद घ्यायची आहे.

Story img Loader