ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत. जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात डेंग्यूचे १०२ तर, मलेरियाचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण आढळून आले असून हे शहर वगळता जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात २० जून ते ७ जुलै या कालावधीत डेंग्यू चे ४३ रुग्ण तर, ८ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ५९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये डेंग्यू चे सर्वाधिक रुग्ण हे कल्याण शहरात आढळले आहेत. तर, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण ठाणे शहरात आढळले आहेत. तसेच ठाणे शहरात गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्लुच्या रुग्ण संख्येतही वाढ होताना दिसत आहे. ठाणे शहरात जुन महिन्यात स्वाईन फ्ल्युचे ८ रुग्ण आढळले होते. तर, ९ जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या ७० वर पोहोचली होती. या आठवड्यात रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सद्यस्थितीला रुग्णांची संख्या १३१ इतकी आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे.

हेही वाचा : विजेअभावी बदलापुरकरांवर आरोग्य, उद्योग आणि पाणी संकट; कार्यालये, बँका, शाळा, दुकानांसह सर्वसामान्य नागरिक जेरीस

कळवा रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू रुग्णांसाठी विशेष कक्ष

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लुच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी एकूण १९ खाटा सज्ज असून त्यातील ४ खाटा या अतिदक्षता विभागातील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या रुग्णालयात स्वाईप टेस्टींगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

साथीच्या आजारांमध्येही वाढ

डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यू या आजारांसह डायरियाच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असून सध्या ही संख्या १६० वर पोहचली आहे.

हेही वाचा : ठाण्यात उंची मार्गरोधक कोसळला, मार्गरोधक अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी

शहरात स्वाईन फ्ल्यूची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कळवा रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.

डॉ. चेतना नितील (मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका)

पावसाळ्याच्या दिवसात सखल भागात पाणी साचून तिथे डासांचा प्रादूर्भाव वाढतो. त्यातून, डेंग्यू मलेरिया सारखे आजार उद्भवतात. पावसाळ्याच्या काळात बाहेरचे अन्न पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. पाणी उकळून प्यावे अशी काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे.

डॉ. कैलास पवार, शल्यचिकित्सक (जिल्हा रुग्णालय, ठाणे)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district 131 swine flu patients also outbreak of dengue and malaria css