ठाणे : गेले अनेक वर्षे कुडाच्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर, कच्चा घरातून पक्क्या घरता जाणार या भावनेने अनेकांचे अश्रु अनावर झाले होते. हे चित्र प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. गरीब आणि बेघर कुटुंबियांना किफायतशीर घर बांधण्यास अनुदान मिळून देणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना टप्पा – २ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शनिवारी मंजुरीपत्र प्रदान करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी काही लाभार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या.
ग्रामीण भागात कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न सत्यात उतरावे. त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल योजनेसह राज्य पुरस्कृत घरकुल योजना, महा आवास योजना राबविण्यात येतात. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत या योजना राबविल्या जातात. यातील एक म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला १८ हजार २४८ घरकुलांचे उद्दिष्ट्ये दिले होते. त्यापैकी १७ हजार ९७५ लाभार्थी घरकुलांसाठी प्राप्त झाले. या लाभार्थ्यांना शनिवारी मंजुरीपत्र आणि त्याचबरोबर, सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना अश्रु अनावर झाले होते. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक आयुक्त पुनर्वसन अमोल यादव, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे आदी उपस्थित होते.
लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया…
आमच्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास ही योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेच्या मार्फत पक्क घर बांधण्यासाठी मला मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता देण्यात आला आहे. ही माझ्या कुटुंबियांसाठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अंबरनाथ तालुक्यातील लाभार्थी अर्चना यशवंत पतंगराव यांनी दिली. माझे कुडाच्या घरात बालपण गेले आणि लग्नानंतर देखील कुडाच्या घरातच राहत होते. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक १ मुळे माझे स्वतःचे पक्के घर तयार झाले असल्याचे भिवंडी तालुक्यातील लाभार्थी विद्या पाटील यांनी दिली. तर, मुरबाड येथील रमेश भोईर यांनी पुढच्या पिढीचे दिवस सुखात जातील अशी भावना व्यक्त केली.