ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मागील वर्षभराच्या कालावधीत २ हजार ७३६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ५५२ महिलांवर बलात्कार आणि १८३ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याचबरोबर हुंडाबळी, अपहरण, मारहाण, अनैतिक व्यापार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या सांख्यिकी अहवालातून ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या या गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू नये याची काळजी पोलिस यंत्रणेकडून घेतली जात असली तरी जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मागील वर्षभराच्या कालावधीत महिलांवर झालेल्या अत्याचाराची संख्या अधिक आहे. महिला सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस प्रशासन तसेच जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे विविध उपयोजना राबविण्यात येत असतात. याच बरोबर महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचार विरूध्द महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी यासाठी देखील जनजागृती करण्याचे काम मोठ्या प्रमाणत करण्यात येत असते. मागील वर्षभराच्या कालावधीत ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिला अत्याचाराचे तब्बल २ हजार ७३६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्याची ५५२ प्रकरणे आहेत तर १८३ महिलांवर लैंगिक अत्याचार सारख्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात दिवसाला दोन महिलांवर लैंगिक अत्याचाराची घटना घडत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. याचबरोबर महिलांची फसवणूक करून त्यांना अनैतिक देह व्यापार करण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकरणांची देखील संख्या चिंताजनक आहे.
हेही वाचा : राज्यमंत्री कपिल पाटील यांचा दिल्लीचा मार्ग यंदा खडतर ?
महिलांवर झालेल्या अत्याचार गुन्ह्यांची नोंद ( २०२३ )
बलात्कार – ५५२
अपहरण – ६९०
हुंडाबळी – ६
लैंगिक अत्याचार – १८३
अनैतिक व्यापार – ३७
मारहाण आणि इतर हिंसाचार – १ हजार २६८